शाओमी सुसाट…भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर निर्विवाद वर्चस्व !

0
Xiaomi

शाओमीने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेवर पूर्णपणे वर्चस्व मिळवून पहिला क्रमांक मिळवल्याचे ताज्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सॅमसंग आणि शाओमी कंपन्यांमध्ये सुरू असणारी वर्चस्वाची लढाई आता संपल्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण गत वर्षातील स्मार्टफोन विक्रीच्या आकडेवारीतून शाओमीने आता सॅमसंगला खूप मागे टाकून पहिला क्रमांकावर झेप घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच आयडीसी या संस्थेने भारतीय बाजारपेठेतील २०१८ या वर्षातील स्मार्टफोन विक्रीची आकडेवारी आणि याचे विश्‍लेषण करणारा अहवाल सादर केला आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे शाओमीने आता सॅमसंगला निर्णायकपणे मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे. गत वर्षी भारतात विकल्या गेलेल्या स्मार्टफोनपैकी शाओमीचा वाटा तब्बल २८.९ टक्के इतका होता. तर सॅमसंग मात्र २२.४ टक्के वाट्यासह दुसर्‍या क्रमांकावर फेकली गेल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या क्रमांकासाठी या दोन्ही कंपन्यांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई होती. दोन्ही कंपन्या फार थोड्या फरकाने पहिला-दुसरा क्रमांक मिळवत होत्या. आता मात्र शाओमीच्या झंझावाताला तोंड देणे सॅमसंगला शक्य नसल्याचे अधोरेखीत झाले आहे. या यादीत तिसर्‍या क्रमांकावर विवो असून चौथ्या व पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे ओप्पो व ट्रान्ससिऑन आहे.

दरम्यान, आयडीसीच्या अहवालानुसार गत वर्षी भारतीय ग्राहकांनी १४.२३ कोटी स्मार्टफोन्स खरेदी केले. आधीच्या वर्षापेक्षा हा आकडा १४.५ टक्क्यांनी जास्त आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ऑनलाईन पध्दतीत स्मार्टफोन खरेदी करणार्‍यांची संख्या ३८.४ टक्के इतकी आहे. आता मात्र ई-कॉमर्स कंपन्या नवीन नियमानुसार एक्सक्लुझीव्ह डील्स करू शकणार नसल्यामुळे यात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रिमीयम अर्थात उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या विक्रीत वन प्लस कंपनीने आपला पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here