व्हाटसअ‍ॅपवर मिळणार आपोआप नष्ट होणार्‍या मॅसेजची सुविधा

0

व्हाटसअ‍ॅपच्या युजर्ससाठी लवकरच आपोआप नष्ट होणार्‍या मॅसेजची सुविधा मिळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला लवकरच सेल्फ डिस्ट्रक्टींग अर्थात आपोआप नष्ट होणार्‍या मॅसेजची सुविधा मिळणार आहे. याबाबत WaBetaInfo या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे. वास्तविक पाहता, आधीच स्टेटसच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅप युजर्सला नष्ट होणारे अपडेट करता येते. स्टेटस हे २४ तासानंतर आपोआप नष्ट होते. तथापि, यालाच आता कोणताही ग्रुप अथवा वैयक्तीक चॅटींग करतांना पोस्टच्या स्वरूपात टाकण्याची सुविधा मिळणार आहे. यात २४ तास नव्हे तर युजरला ५ सेकंद ते १ तास या वेळेतील हवा तितका टाईम सेट करता येणार आहे. यामुळे युजर कोणतीही पोस्ट शेअर करण्याआधी एक पॉप-अप विंडो समोर येईल. यात संबंधीत मॅसेज हा सेल्फ डिस्ट्रक्ट या प्रकारात पाठवायचा आहे का ? अशी विचारणा केली जाईल. यात ५ सेकंद आणि १ तास अशा दोन पर्यायांमधून हवा तो पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर संबंधीत मॅसेज हा विहीत वेळेनंतर आपोआप नष्ट होणार आहे. डीलीट फॉर एव्हरीवन या फिचरच्या अंतर्गत मॅसेज डिलीट केला तरी याची माहिती समोरच्याला होत असते. तथापि, या नव्या फिचरच्या माध्यमातून नष्ट करण्यात आलेल्या मॅसेजचे कोणतेही चिन्ह राहणार नाही. अर्थात, संबंधीत मॅसेज हा खरोखर परिपूर्ण पध्दतीत नष्ट होणार आहे.

सध्या हे फिचर बीटा आवृत्तीदेखील सादर करण्यात आलेले नाही. तथापि, लवकरच प्रयोगात्मक अर्थात बीटा स्वरूपात याला वापरण्यासाठी मिळणार असून यानंतर सर्वांसाठी याला सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here