व्हाटसअ‍ॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये नवीन सेटींग व नेटवर्क युजच्या माहितीचा समावेश

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपने आपल्या बीटा युजर्ससाठी नवीन आवृत्ती सादर केली असून यामध्ये नवीन सेटींग देण्यात आली असून युजरला नेटवर्क वापराची अचूक माहिती मिळू शकणार आहे.

व्हाटसअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी बीटा आवृत्ती वापरण्याची सुविधा प्रदान केली असून याच्या माध्यमातून आगामी फिचर्स वापरता येतात. साधारणपणे बीटा आवृत्तीमधील सर्व फिचर्स हे नंतर सर्व युजर्सला देण्यात येतात. यामुळे बीटा आवृत्तीतील फिचर्सकडे सर्वांचे लक्ष असते. या अनुषंगाने व्हाटसअ‍ॅपने आता व्ही२.१९.४५ ही नवीन बीटा आवृत्ती सादर केली आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे नवीन सेटींग विभाग होय. व्हाटसअ‍ॅपच्या सेटींग विभागात आता नवीन डिझाईन देण्यात आली आहे. यामध्ये आयकॉन्स बदलण्यात आले आहेत. तसेच आता सेटींगमध्ये पेमेंट हा नवीन पर्यायदेखील दिलेला आहे. अर्थात, यामुळे आता व्हाटसअ‍ॅपवर लवकरच पेमेंट सिस्टीम येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात संबंधीत पेमेंट सिस्टीमला संलग्न करण्यात आलेले बँक खाते, व्यवहारांची माहिती (पेमेंट हिस्ट्री) आदींबाबत विवरणदेखील दिलेले आहे.

अकाऊंट या विभागातील आयकॉन्सदेखील बदलण्यात आले आहेत. यात चेंज नंबर, टु-स्टेप व्हेरिफिकेशन आदींच्या आयकॉन्सचाही समावेश आहे. नोटिफिकेशन्स या विभागातील आयकॉन्स आधीप्रमाणेच असले तरी हेल्प विभागात बदलण्यात आले आहेत. व्हाटसअ‍ॅपच्या बीटा आवृत्तीमध्ये डाटा अँड स्टोअरेज युजेस या विभागात आता युजरला त्याने वापरलेल्या डाटाबाबत अचूक माहिती मिळणार आहे. यात युजरच्या नेटवर्कसह कॉल, मीडिया, मॅसेज आदी विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे फिचर्स सर्व युजर्सला मिळणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here