व्हर्टीकल व्हिडीओच्या युगात प्रवेश !

0

सध्या मी व्हिडीओजसोबत थोडा खेळतोय…जोडीला डिजीटल मिडीयातील कामे आहेच. हे सारे होत असतांना एका मनोरंजक बातमीने माझे लक्ष वेधून घेतले असून याबाबतचे विचार आपणासोबत याला शेअर करत आहे. सॅमसंगने सेरो हा नवीन टिव्ही लाँच केल्याची ही बातमी होय. आता आपण म्हणाल की, यात नवे तरी काय ? बाजारात तर शेकडो टिव्ही आहेत. मग यात नवे ते काय ? तर हा टिव्ही चक्क व्हर्टीकल म्हणजे उभा आहे. अर्थात, आपण आजवर आयताकृती आडवे टिव्ही पाहिले असतील. मात्र हा टिव्ही उभ्या आकारातील आहे. हे पूर्ण वृत्त आपण http://bit.ly/2UQYBfA या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.

सॅमसंगने व्हर्टीकल टिव्ही लाँच करतांना हे मॉडेल सोशल मीडियातील कंटेंटशी सुसंगत असेल असे कारण दिले आहे. आता आपल्या लक्षात आले असेलच की, स्मार्टफोनवरून चित्रीत करून शेअर करण्यात आलेले बहुतांश व्हिडीओज हे व्हर्टीकल अर्थात उभेच असतात. याला आपण टिव्ही, डेस्कटॉप, लॅपटॉप आदी आयताकृती डिस्प्लेवर पाहिले असता याच्या डाव्या व उजव्या बाजूस काळा पट्टा दिसतो. अर्थात, याच्या अगदी विरूध्द म्हणजे स्मार्टफोनसारख्या व्हर्टीकल डिस्प्लेवर आयताकृती व्हिडीओज पाहतांना हाच काळा पट्टा वर आणि खालील बाजूस दिसतो. ही समस्या लक्षात घेऊन बहुतांश सोशल मीडिया संकेतस्थळांनी व्हर्टीकल व्हिडीओजचा सपोर्ट प्रदान केला आहे. आपण जर लक्ष देऊन पाहिले तर फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, युट्युब आदींवरील बहुतांश व्हिडीओज हे व्हर्टीकल या प्रकारातील आहेत. फेसबुकच्या ताज्या आकडेवारीनुसार जगातील ८२.५ टक्के लोक हे उभे व्हिडीओ पाहत आहेत. यामुळे आपण पारंपरीक लँडस्केप मोडमधील आयताकृती व्हिडीओकडून पोर्ट्रेट मोडमधील व्हर्टीकल व्हिडीओच्या युगात प्रवेश केल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. स्मार्टफोनसारख्या उपकरणांमध्ये हे दोन्ही मोड अगदी सहजपणे फ्लिप करून पाहता येतात. उद्या याच प्रमाणे अ‍ॅडजस्टेबल टिव्हीदेखील बाजारात येणार असल्याची बाब उघड आहे. वर नमूद केलेल्या सॅमसंगच्या टिव्हीतदेखील व्हर्टीकल व हॉरिझाँटल या दोन्ही प्रकारात डिस्प्ले अ‍ॅडजस्ट करण्याची सुविधा दिलेली असल्याची बाब लक्षात घेण्याजोगी आहे.

उभ्या व आडव्या या दोन्ही प्रकारातील व्हिडीओजमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असतांना व्हिडीओ कंटेंट निर्मित करणार्‍यांनाही हा बदल लक्षात घ्यावा लागणार आहे. आपले जास्तीत जास्त प्रेक्षक हे स्मार्टफोनसारख्या उपकरणांच्या माध्यमातून, फेसबुकादी साईटवरून व्हिडीओज बघतील हे लक्षात घेऊन चित्रीकरणाचा फॉर्मेट बदलावा लागेल. अर्थात, व्हिज्युअल स्टोरी टेलींगमध्ये आमूलाग्र बदलाची सुरवात झालीय. या बदलासाठी आता टिव्हीसारख्या उपकरणांमध्ये बदल होऊ लागलाय. हाच बदल कंटेंट निर्मार्त्यांसोबत डिजीटल माध्यमात जाहिरात करणार्‍यांनाही लक्षात घ्यावा लागेल. डिजीटल माध्यमात परिणामकारक जाहिरातींसाठी व्हर्टीकल फॉर्मेटचा अंगीकार करणे गरजेचे आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आधीच या प्रकाराचा स्वीकार केला आहे. लवकरच हा ट्रेंड आपल्या भोवतालपर्यंत झिरपणार आहे.

व्हर्टीकल व्हिडीआजच्या भविष्याबाबत विचार केला असता, अनेक तज्ज्ञांनी विविध मते प्रदर्शीत केली आहेत. जगात प्रचलीत असणारा पुस्तकांचा फॉर्मेट हा व्हर्टीकल तर टिव्ही, संगणक, लॅपटॉप आदी उपकरणांचा फॉर्मेट हॉरिझाँटल आहे. वर्तमानपत्र वाचतांना आपल्याला व्हर्टीकल आणि हॉरिझाँटल या दोन्ही प्रकारात सहजपणे बदल करता येतो. याच प्रमाणे लवकरच फोल्डेबल डिस्प्ले प्रचलीत होण्याची शक्यता असून यात उभे आणि आडवे व्हिडीओ सहजपणे डिस्प्लेचा आकार बदलून पाहता येतील. तर या दोन्ही व्हिडीओंना डिस्प्लेचा आकार पाहून सहजपणे परिवर्तीत करण्यासाठी एखादे टुल वा सॉफ्टवेअर आल्यास या क्षेत्रात नवीन क्रांती होण्याची शक्यतादेखील आहे. असो. सध्या तरी व्हर्टीकल व्हिडीओजच्या युगात आपण प्रवेश केला असून याला एंजॉय करणे इतकेच आपल्या हातात आहे.

: शेखर पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here