व्होडाफोन-आयडियाची लवकरच म्युझिक स्ट्रीमिंग सेवा

0

व्होडाफोन-आयडिया लवकरच भारतीय ग्राहकांसाठी म्युझिक स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

व्होडाफोन आणि आयडिया या टेलकॉम क्षेत्रातील दोन मातब्बर कंपन्यांचा अलीकडेच विलय झाला आहे. यातून उदयास आलेली व्होडाफोन-आयडिया आता देशातील पहिल्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. अर्थात, या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीत आव्हानाला तोंड देण्यासाठी अन्य कंपन्यांनी आक्रमक रणनिती आखली आहे. यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्होडाफोन-आयडियादेखील सज्ज असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने ही कंपनी आता म्युझिक स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर आयडिया म्युझिक या नावाने आयडियाची आधीच संगीत सेवा अस्तित्वात होती. मात्र याऐवजी स्वतंत्र सेवा सुरू करण्यात येणार आहे. आयडियाकडे आधीच ३० लाख गाण्यांचा अजस्त्र संग्रह आहे. यात अजून भर टाकून व्होडाफोन आयडिया म्युझिक स्ट्रीमिंग सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

व्होडाफोन आयडियाची म्युझिक स्ट्रीमिंग सेवा ही स्वतंत्र अ‍ॅपच्या स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. याला अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात येईल. यामुळे एयरटेलची विंक आणि जिओच्या जिओसावन या दोन्ही सेवांसाठी तीव्र स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील म्युझिक स्ट्रीमिंग सेवा ही प्रचंड गतीने विस्तारण्याच्या स्थितीत आहे. विंक व जिओसावनसोबत गाना, हंगामा, अमेझॉन प्राईम म्युझिक आदींनी युजर्सला आधीच आकर्षीत केले आहे. या पार्श्‍वभूमिवर, बाजारपेठेत स्थिरावण्यासाठी व्होडाफोन-आयडियाच्या या नवीन सेवेला नक्कीच परिश्रम करावे लागतील हेदेखील तितकेच खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here