लवकरच टिकटॉकवर व्हाटसअ‍ॅपवर शॉर्टकटची सुविधा !

0

एकीकडे टिकटॉक हे वादाच्या भोवर्‍यात सापडले असतांना हे अ‍ॅप लवकरच व्हाटसअ‍ॅपवर थेट व्हिडीओ शेअरिंगसाठी शॉर्टकटची सुविधा देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

टिकटॉक या अ‍ॅपने जगभरातील युजर्सला अक्षरश: वेड लावले आहे. अतिशय मनमोहक आणि मनोरंजक पध्दतीत शॉर्ट व्हिडीओ अपलोड करून शेअर करण्याची सुविधा यात दिली असून ती लोकप्रिय झाली आहे. तथापि, हे अ‍ॅप युजर्सची गोपनीय माहिती चोरत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. याशिवाय, यावर हिंसक, अश्‍लील आणि सर्वात धक्कदायक बाब म्हणजे भारतविरोधी व्हिडीओज अपलोड होत असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. यावरून मध्यंतरी भारतात यावर बंदीदेखील घालण्यात आली होती. आता हे अ‍ॅप भारतीयांसाठी उपलब्ध असले तरी यावर बंदी लादण्याची मागणी सातत्याने होत आहे.

दरम्यान, एकीकडे हा कल्लोळ सुरू असतांना टिकटॉकची निर्माती कंपनी असणार्‍या बाईट डान्सने यात नवनवीन फिचर्सची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगाने युजर्सला टिकटॉकवरील व्हिडीओ हे अन्य सोशल साईटवर सुलभपणे शेअर करण्याची सुविधा देण्याच्या हालचाली दिसून येत आहेत. यातील पहिला टप्पा हा व्हाटसअ‍ॅप शेअरिंगचा असेल. अर्थात टिकटॉकवरील कोणताही व्हिडीओ हा याच अ‍ॅपवरून व्हाटसअ‍ॅपवर शेअर करता येईल. यात ग्रुप आणि वैयक्तीक इनबॉक्स हे दोन्ही पर्याय असतील. येथे लक्षात घेण्याची बाब अशी की, टिकटॉकवर आधीच शेअर हा पर्याय असून यात फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाटसअ‍ॅप आदी पर्यायांचा समावेश आहे. तथापि, नवीन फिचरच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅप शेअरिंगसाठी शॉर्टकट प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच डिस्कव्हर या नावाने स्वतंत्र विभाग देण्यात येणार असून युजरला त्याच्या आवडी-निवडीशी संबंधीत व्हिडीओज एकाच ठिकाणी पहायला मिळतील. या माध्यमातून टिकटॉकचा लेआऊट हा थोड्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. काही युजर्सच्या माध्यमातून या सर्व बदलांची चाचणी करण्यात येत असून लवकरच सर्व युजर्ससाठी याला सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here