टिकटॉक सुसाट…अवघ्या तीन महिन्यात जोडले विक्रमी युजर्स

0

टिकटॉक या व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपची भारतातील घोडदौड सुरू असून या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या अ‍ॅपने विक्रमी युजर्स जोडले आहेत.

बाईट डान्स या चिनी कंपनीची मालकी असणार्‍या टिकटॉक अ‍ॅपने सध्या युजर्सला वेड लावले आहे. विशेष करून तरूणाई आणि बच्चे कंपनी याच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. अर्थात, यासोबत अनेक गैरबाबीदेखील उघडकीस आल्या असल्याने हे अ‍ॅप वादाच्या भोवर्‍यातही सापडले आहे. अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालण्याचे निर्देश दिले असून याबाबत सुनावणी सुरू आहे. विशेष करून मुलांची गोपनीय माहिती जगजाहीर होत असल्यामुळे या अ‍ॅपबाबत तक्रारी सुरू झाल्या आहेत. एकीकडे टिकटॉक वादाच्या भोवर्‍यात सापडत असतांना दुसरीकडे मात्र याच्या लोकप्रियतेचा आलेख प्रचंड गतीने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सेन्सर टॉवर या रिचर्स फर्मने या वर्षाची पहिली तिमाही म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या कालखंडातील विविध अ‍ॅप्सच्या डाऊनलोडची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार या तिमाहीत टिकटॉकने भारतात तब्बल ८.८६ कोटी नवीन युजर्स जोडले आहेत. गत वर्षी हाच आकडा फक्त १.१८ कोटी इतका होता. यामुळे फक्त एका वर्षात टिकटॉकने अनेक पटीने युजर्सला आकर्षीत करण्यात यश संपादन केल्याचे स्पष्ट झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे जागतिक पातळीवरही टिकटॉकला याच प्रकारची लोकप्रियता मिळाली आहे. यामुळे गत तीन महिन्यात व्हाटसअ‍ॅप आणि फेसबुक मॅसेंजरच्या पाठोपाठ टिकटॉक हे डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत तिसर्‍या क्रमांकवर विराजमान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here