ट्रिपल कॅमेर्‍यांनी युक्त टेक्नो स्पार्क ४ स्मार्टफोन सादर

0

टेक्नो मोबाईल कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांसह अनेक सरस फिचर्सने सज्ज असणारा स्पार्क ४ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

टेक्नो मोबाईल कंपनीने अलीकडे एकामागून एक नवनवीन मॉडेल्स सादर करण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. यात आता टेक्नो स्पार्क ४ या मॉडेलची भर पडली आहे. हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ७,९९९ आणि ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. वर नमूद केल्यानुसार या मॉडेलच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असून याला २ मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आणि तिसर्‍या लो-लाईट सेन्सरची जोड देण्यात आलेली आहे. यात बोके इफेक्ट, पीडीएएफ, एआर स्टीकर, एआय एचडीआर, एआय ब्युटी, पॅनोरामा आदी फिचर्स दिलेले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

याशिवाय, टेक्नो स्पार्क ४ या मॉडेलमध्ये ६.५२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यावर वॉटरड्रॉप नॉच दिलेला आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ पी २२ प्रोसेसर असून याचे वर नमूद केल्यानुसार दोन रॅम व स्टोअरेजचे व्हेरियंट उपलब्ध केलेले आहेत. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here