टिसीएलचे अँड्रॉइड स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत दाखल

0

टिसीएल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे स्मार्ट टिव्ही सादर केले असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

भारतीय बाजारपेठेत अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे स्मार्ट टिव्ही प्रचंड गतीने लोकप्रिय होतांना दिसून येत आहेत. अनेक कंपन्यांनी अतिशय किफायतशीर मूल्यात स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत उपलब्ध केले आहेत. तर अन्य काही कंपन्यांनी मध्यम आणि उच्च किंमतपट्टयातील मॉडेल्सला प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने टिसीएल कंपनीने मध्यम किंमतपट्टयातील सी६ आणि पी८ हे स्मार्ट टिव्ही भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. यातील टिसीएल सी ६ हे मॉडेल ५५ आणि ६५ इंच आकारमानाच्या पर्यायात सादर केले असून यांचे मूल्य अनुक्रमे ५९,९९९ आणि ८९,९९० रूपये आहे. तर पी ८ हे मॉडेल ८५ इंच आकारमानात सादर करण्यात आले असून याचे मूल्य १,९९,९९० रूपये इतके आहे.

टिसीएल कंपनीचे हे दोन्ही स्मार्ट टिव्ही अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहेत. टिसीएल सी ६ मॉडेलची रॅम २.५ तर पी८ मॉडेलची रॅम २ जीबी इतकी आहे. तर यात १६ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज दिलेले आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आले असून इनबिल्ट वाय-फाय सपोर्ट दिलेला आहे. यात गुगलचे क्रोमकास्ट हे इनबिल्ट देण्यात आले असून कुणीही आपल्या स्मार्टफोनवरील कंटेंट यावर अगदी सहजपणे पाहू शकतो. यात गुगल प्ले स्टोअरवरून विविध अ‍ॅप्स इन्स्टॉल करून वापरता येणार आहेत. यात गुगल असिस्टंट दिलेला असल्यामुळे कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा वापर करून विविध फंक्शन्स कार्यान्वित करू शकतो. या दोन्ही टिव्हीचा डिस्प्ले फोर-के क्षमतेचा असून यात १० पॉईंट व्हाईट बॅलन्स व मायक्रो डिमींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात अतिशय दर्जेदार अशी ३० वॅट क्षमतेची ध्वनी प्रणाली दिलेली आहे. टिसीएल कंपनीने अल्ट-बालाजी, इरॉस नाऊ, वुठ, झी५, जिओ सिनेमा, हंगामा प्ले, हॉटस्टार आणि युप टिव्ही आदींसोबत करार केल्यामुळे युजर्सला मनोरंजनाचा अक्षरश: खजिना उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here