व्हाटसअ‍ॅपवर विविध ग्रुप्सची झटपट निर्मिती व युजर्स जोडण्यावर येणार निर्बंध !

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅपवर अल्पावधीतच विविध ग्रुप्सची निर्मिती तसेच युजर्सला जोडण्यावर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता असून याबाबत लवकर घोषणा होऊ शकते.

व्हाटसअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरत असतात. यावर उपायोजना करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येत आहे. यासोबत स्पॅम मॅसेजच्या प्रचार-प्रसारालाही आळा घालण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. गत काही महिन्यांचा विचार केला असता, व्हाटसअ‍ॅपने आपल्या फास्ट फॉरवर्ड या फिचरच्या अंतर्गत एखादा मॅसेज पाच युजर्सपुरताच फॉरवर्ड करण्याचे निर्बंध लादले आहेत. याशिवाय, फॉरवर्डेड संदेशाच्या वर याची माहिती देण्यात येत आहे. तसेच, एखाद्याने व्हायरसयुक्त लिंक शेअर करण्याचा प्रयत्न केल्यावर संबंधीत लिंक संशयास्पद असल्याचा इशारा देण्याची प्रणालीसुध्दा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातच आता दोन नवीन फिचर्सचा समावेश होणार असल्याचे माहिती माय स्मार्ट प्राईस या टेक पोर्टलने दिली आहे.

या पोर्टलने व्हाटसअ‍ॅपच्या आगामी आवृत्तीच्या सोर्स कोडचे अतिशय तीक्ष्ण अवलोकन केले असता त्यांना यात दोन आगामी फिचर्सची माहिती मिळाली आहे. याच्या अंतर्गत कुणीही अल्पावधीत अनेक व्हाटसअ‍ॅप ग्रुपची निर्मिती केल्यास संबंधीत युजरला अलर्ट देण्यात येणार आहे. यानंतर याला काही काळापर्यंत नवीन व्हाटसअ‍ॅप ग्रुप स्थापन करण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. तर कुणी एखाद्या ग्रुपमध्ये विविध युजर्सला झटपट जोडण्याचा प्रयत्न केल्यासही याच प्रकारचा अलर्ट देण्यात येणार असल्याचा दावा या टेक पोर्टलने केला आहे. अर्थात, ग्रुप तयार करणे अथवा सदस्यांना जोडण्यावर पूर्णपणे निर्बंध येणार नसल्याची बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे दोन फिचर फक्त स्पॅमींगला अटकाव करण्यासाठी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही फिचर्स अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला सादर करण्यात येतील असा दावा या वृत्तात केला आहे.

{ वर नमूद केल्यानुसार व्हाटसअ‍ॅपच्या सोर्स कोडमध्ये या मॅसेंजरच्या आगामी फिचर्सचे सूतोवाच करण्यात आले आहे. }

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here