हरवलेल्या स्मार्टफोनला ब्लॉक वा ट्रॅक करणे होणार सोपे !

0

केंद्र सरकारने आयएमर्ईआय क्रमांकाचा डाटाबेस तयार करण्यास मंजुरी दिली असून यामुळे हरवलेला वा चोरलेल्या स्मार्टफोनला ब्लॉक वा ट्रॅक करणे सोपे होणार आहे.

आयएमईआय अर्थात इंटरनॅशनल मोबाईल इक्वीपमेंट आयडेंटीटी हा प्रत्येक मोबाईल हँडसेटसाठी एकमेवाद्वितीय (युनिक) क्रमांक असतो. अर्थात पृथ्वीवरील दोन मोबाईल हँडसेटचा आयएमईआय क्रमांक समान असू शकत नाही. केंद्र सरकारने आधीच देशात हा क्रमांक नसणार्‍या हँडसेट विक्रीवर बंदी घातली असून यामुळे बर्‍याच प्रकारच्या गैर प्रकारांना आळा बसला आहे. आयएमईआय क्रमांकाची छेडछाड करणे अथवा तत्सम गैरप्रकार केल्यास तीन वर्षांच्या शिक्षेचे प्रावधानदेखील करण्यात आले आहे. सध्या कोणताही मोबाईल हँडसेट हरवला अथवा चोरी करण्यात आल्यास युजरला पोलिसांकडे तक्रार करून कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये संपर्क करावा लागतो. ही प्रक्रिया थोडी वेळकाढू आहे. यामुळे अनेकदा चोरलेल्या स्मार्टफोनचा गैरवापर होण्याची उदाहरणे समोर आली आहेत. या पार्श्‍वभूमिवर, केंद्र सरकारने सीईआयआर म्हणजे सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर या नावाने एक डाटाबेस तयार करण्याला मंजुरी दिली असून यासाठी १५ कोटी रूपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे.

हा डाटाबेस तयार झाल्यावर दूरसंचार विभागाला कोणताही आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्याची सुविधा मिळेल. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन तयार करण्यात येतील. यावरून कुणाही ग्राहकाने आपल्या हरवलेल्या अथवा चोरीस गेलेल्या हँडसेटबाबत पहिल्यांदा पोलीस स्थानकात तक्रार करून लागलीच या हेल्पलाईनवर तक्रार करायची आहे. यामुळे संबंधीत आयएमईआय क्रमांक तात्काळ ट्रॅक वा ब्लॉक करता येईल. यामुळे मोबाईल हँडसेट अचूकपणे ट्रॅक होईल. तसेच याचा गैरवापरदेखील टाळला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here