व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये प्रायव्हेट शेअरिंग करता येणार

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप ग्रुपमध्ये लवकरच प्रायव्हेट शेअरिंग करता येणार असल्याची माहिती मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केली आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या समूहाच्या २०१९ मधील वाटचालीबाबत भाष्य केले आहे. त्यांची आपल्या आजवरच्या वाटचालीचा त्रोटक आढावादेखील घेतला आहे. यानुसार, जगभरात सध्या फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, व्हाटसअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामचा वापर जगभरातील तब्बल २७० कोटी लोक करत आहेत. यातील २०० कोटी युजर्स हे यापैकी एक वा त्यापेक्षा जास्त सेवा दिवसातून एक वेळेस तरी वापरतात. या अनुषंगाने २०१९ मध्ये या सर्वांच्या वाटचालीसाठी मार्क झुकरबर्ग यांनी चतु:सुत्री जाहीर केली आहे. याच्या अंतर्गत सायबरविश्‍वासह कंपनीतील सामाजिक मुद्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. व्यवसायाच्या नवनवीन संधींचा शोध घेतला जाईल. तसेच लोकांना अधिक पारदर्शक पध्दतीत संवाद साधता यावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

यातील तिसर्‍या मुद्यात मार्क झुकरबर्ग यांनी व्यवसायाच्या नवीन संधीबाबत सूतोवाच केले आहे. या अनुषंगाने व्हाटसअ‍ॅपची पेमेंट सिस्टीम ही जगातील काही देशांमध्ये सादर करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. भारतासह अन्य काही देशांमध्ये याची आधीच चाचणी सुरू आहे. यामुळे आता लवकरच व्हाटसअ‍ॅपवर पेमेंट सिस्टीम येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वर्षी व्हाटसअ‍ॅपवरील स्टोरीजला केंद्रस्थान मिळणार असल्याचे भाकितदेखील झुकरबर्ग यांनी केले आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे व्हाटसअ‍ॅपवर लवकरच कुणीही युजर एखाद्या ग्रुपमध्ये प्रायव्हेट शेअरिंग करू शकेल. हे फिचर नेमके कसे कार्य करेल याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र एखाद्या ग्रुपमध्ये कोणतीही पोस्ट शेअर करतांना ती संबंधीत ग्रुपमधील कोण पाहू शकेल? याची निवड करण्याचे स्वातंत्र्य युजरला मिळू शकते असे यातून अधोरेखीत झाले आहे. हे फिचर अतिशय उपयुक्त ठरण्याची शक्यता असल्यामुळे सायबरविश्‍वात याबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here