सारेगामा कारवा २.० आवृत्ती सादर

0

सारेगामा कंपनीने आपल्या कारवा या लोकप्रिय मॉडेलची २.० ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

सारेगामाच्या कारवा या मॉडेलला अतिशय प्रतिसाद लाभला आहे. आता याचीच पुढील आवृत्ती कारवा २.० या नावाने सादर करण्यात आली आहे. नावातच नमूद केल्यानुसार यात मूळ आवृत्तीपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे वाय-फायचा सपोर्ट होय. यामुळे आता होम वाय-फायच्या मदतीने हा स्पीकर इंटरनेटशी जोडता येणार आहे. याच्या मदतीने सुमारे १०० रेडिओ स्टेशन्सवरील कार्यक्रम यावर ऐकता येणार आहे. या स्टेशन्सची संख्या लवकरच एक हजारपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती सारेगामाने जाहीर केली आहे. आधीच्या मॉडेल्सपेक्षा यातील बॅटरी ही अधिक कार्यक्षम असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पाच ते सहा तासांचा बॅकअप देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सारेगामा कारवा २.० या मॉडेलमधील उर्वरित फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच आहेत. अर्थात, यातही ५,००० हिंदी गाणी प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आलेली आहेत. ही गाणी विविध प्रकारांमध्ये वर्गीकृत करण्यात आली असून यामुळे युजरला सुलभपणे वापरण्याची सुविधा दिलेली आहे. यातदेखील एएम आणि एफएम रेडिओ इनबिल्ट स्थितीत दिलेला आहे. याला क्लासीक ब्लॅक व एमरेल्ड गोल्ड या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये ७,९९० रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. दरम्यान, याच मॉडेलसोबत कारवा २.० गोल्ड ही नवीन आवृत्तीदेखील सादर करण्यात आली आहे. याचे मूल्य १५,९९० रूपये आहे. यात अतिशय मजबूत व आकर्षक अशी सोनेरी रंगाचे बाह्य आवरण प्रदान करण्यात आले आहे. तसेच यात अतिशय दर्जेदार अशी हर्मन कार्दोन कंपनीची ध्वनी प्रणाली दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here