ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त सॅमसंग गॅलेक्सी एम ४०

0

सॅमसंगने ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा गॅलेक्सी एम ४० हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने आधीच भारतीय ग्राहकांना एम या मालिकेत एम १०, एम २० आणि एम ३० हे मॉडेल्स सादर केलेले आहेत. यात आता एम ४० या नवीन मॉडेलची भर पडली आहे. १८ जूनपासून हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या स्टोअर्समधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याचे ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज हे व्हेरियंट मिडनाईट ब्ल्यू आणि सी वॉटर ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायात १९,९९० रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

वर नमूद केल्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी एम ४० या मॉडेलमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा ३२ मेगापिक्सल्सचा असून उर्वरित दोन कॅमेरे ८ आणि ५ मेगापिक्सल्सचे आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी एम ४० या स्मार्टफोनमध्ये ६.१३ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस (२३४० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा आणि इन्फीनिटी ओ या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये स्क्रीन साऊंड या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे इयरपीसशिवाय ध्वनी ऐकता येणार आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७७५ हा प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह यातील बॅटरी ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणार असून यावर कंपनीचा वन युआय हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here