सावन या ऑडिओ स्ट्रीमिंग अॅपला रिलायन्स जिओने अधिग्रहीत केले असून याचे नाव आता जिओसावन असे असणार आहे.
या वर्षीच्या मार्च महिन्यातच रिलायन्स जिओने सावनला अधिग्रहीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या अनुषंगाने आकाश अंबानी यांनी अधिग्रहणाच्या प्रक्रियेला चालना दिली होती. आता ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती जिओतर्फे देण्यात आली आहे. अर्थात आता सावन आणि जिओ म्युझिक यांचा विलय होऊन जिओसावन ही नवीन सेवा अस्तित्वात आली आहे. अर्थात नाव बदलले तरी सावन अॅपचा युजर इंटरफेस आणि यातील प्ले-लिस्ट ही आधीप्रमाणेच असणार आहे. पहिल्या टप्प्यात सावनच्या आयओएस अॅपचे नाव बदलण्यात आले असले तरी अँड्रॉइडसाठी आधीचेच नाव (सध्या तरी) कायम ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. अर्थात, लवकरच जिओ म्युझिक आणि सावन हे स्वतंत्र अॅप बंद होऊन त्यांच्या जागी जिओसावन हे नवीन अॅप सादर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधीच जिओ म्युझिक वापरत असणार्या युजर्सला जिओसावनची सेवा मोफत वापरता येणार आहे. तर जिओच्या प्रिपेड आणि पोस्ट पेड सेवाधारकांसाठी ९० दिवसांपर्यंत जिओसावनची प्रो सेवा फुकट वापरता येईल. या सेवेमध्ये रिलायन्स जिओ सुमारे १ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यावर तब्बल ४.५ करोड गाण्यांचा अजस्त्र खजिना असून भारतीय ग्राहकांना तो भावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत ऑन-डिमांड म्युझिक स्ट्रीमिंग लोकप्रिय होऊ लागली आहे. या क्षेत्रात गाना हे अॅप आघाडीवर आहे. तर विंक आणि व्होडाफोन प्ले या सेवांनाही पसंती मिळू लागली आहे. यांच्याशी टक्कर घेत आगेकूच करण्याचे आव्हान जिओसावन सेवेसमोर असणार आहे.