रिलायन्स जिओची डिजीटल उडान मोहीम

0

रिलायन्स जिओने डिजीटल उडान या नावाने नवीन मोहीम सुरू केली असून याच्या अंतर्गत इंटरनेट साक्षरतेला गती देण्यात येणार आहे.

भारतात स्मार्टफोनचे युजर्स प्रचंड प्रमाणात वाढत असून याच गतीने इंटरनेट वापरणार्‍यांची संख्यादेखील वाढत आहे. अर्थात, इंटरनेट पहिल्यांदा वापरणार्‍यांना खूप अडचणी येतात. विशेष करून भारतीय भाषांमध्ये याबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध नसल्यामुळे युजर्सची खूप गोची होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रिलायन्स जिओने फेसबुकच्या सहकार्याने डिजीटल उडान या नावाने नवीन इंटरनेट साक्षरता मोहीम सुरू केली आहे. याच्या अंतर्गत युजरला प्रत्येक शनिवारी इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात जिओफोन हाताळणीसह फेसबुकसारख्या अ‍ॅपचा वापर नेमका कसा करावा याबाबतचे शिक्षण दिले जाणार आहे. याला पहिल्या टप्प्यात दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून लवकरच यात अन्य भाषांचा समावेश होणार असल्याचे जिओतर्फे जाहीर करण्यात आले आहे. इंटरनेट सेफ्टीबाबतही यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिजीटल उडान ही ऑफलाईन मोहीम असून सध्या १३ देशांमध्ये २०० गावांमध्ये याला उपलब्ध करण्यात आलेले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये याला तब्बल सात हजार ठिकाणी लाँच केले जाणार आहे. यात इंटरनेट साक्षरतेला अतिशय मनोरंजनात्मक पध्दतीत सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. दरम्यान, रिलायन्स जिओचे सध्या सुमारे ३० कोटी युजर्स असून यात प्रत्येक दिवसाला भर पडतच आहे. या कंपनीने अलीकडेच आपल्या फोरजीव्हॉईस या अ‍ॅपला जिओकॉल या नावासह नव्याने रिलाँच केले आहे. यात कुणीही युजर फिक्स्ड लाईन फोनशी आपल्या स्मार्टफोनला कनेक्ट करून कॉल करू शकतो. तर येत्या काही दिवसांमध्ये याच कंपनीची गिगाफायबर ही ऑप्टीकल फायबर इंटरनेट सेवादेखील अधिकृतपणे सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here