चार कॅमेर्‍यांनी युक्त आहेत रिअलमीचे हे स्मार्टफोन्स !

0

रिअलमीने चार कॅमेर्‍यांनी युक्त असणारे रिअलमी ५ आणि ५ प्रो हे दोन स्मार्टफोन्स आज भारतीय ग्राहकांसाठी सादर केले आहेत.

गत अनेक दिवसांपासून रिअलमी ५ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज रिअलमी ५ आणि रिअलमी ५ प्रो हे दोन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यातील रिअलमी ५ हे मॉडेल ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज; ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा तीन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे ९,९९९; १०,९९९ आणि ११,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. तर रिअलमी ५ प्रो हे मॉडेल अनुक्रमे ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज; ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये अनुक्रमे १३,९९९; १४,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

वर नमूद केल्यानुसार या मॉडेल्सची खासियत म्हणजे याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातल्या रिअलमी प्रो ५ या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ११९ डिग्री व्ह्यू असणारा ८ मेगापिक्सल्सचा; मायक्रो लेन्सयुक्त २ मेगापिक्सल्सचा तसेच डेप्थ सेन्सरयुक्त २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड देण्यात आलेली आहे. यांच्या मदतीने अतिशय दर्चेदार छायाचित्रे घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. तर रिअलमी ५ या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा असून याला ८, २ आणि २ या कॅमेर्‍यांची जोड आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे.

रिअलमी ५ या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६५ हा प्रोसेसर आहे. तर यात फास्ट चार्जींगने युक्त असणारी ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर रिअलमी ५ प्रो या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यावर गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यात ४०३५ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर कलर ओएसचा युजर इंटरफेस दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here