आपल्या मोबाईलला मिळणार ब्लॉकचेनचे अभेद्य सुरक्षा कवच !

0

तानला सोल्युशन्स या भारतीय कंपनीने जगात पहिल्यांदाच ब्लॉकचेनवर आधारित ट्रुबॉक ही सुरक्षा प्रणाली तयार केली असून यामुळे मोबाईल युजर्सला अभेद्य सुरक्षा कवच मिळणार आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान आपल्या डिजीटल जीवनाचा लवकरच अविभाज्य घटक बनणार आहे. याची व्याप्ती खूप मोठी असून याचा अनेक क्षेत्रांमध्ये वापर होणार आहे. तथापि, या तंत्रज्ञानाच्या मदतीने विशेष करून ऑनलाईन देवाण-घेवाण आणि संवाद वहन हे अतिशय सुरक्षीत पध्दतीने करता येणार आहे. या अनुषंगाने बार्सिलोना शहरात सुरू असणार्‍या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये तानला सोल्युशन्स या भारतीय कंपनीने जगात पहिल्यांदाच ब्लॉकचेनवर आधारित ट्रुब्लॉक (Trubloq) प्रणाली सादर केली आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय दूरसंचार नियामक प्राधीकरण म्हणजेच ट्रायने याच्या वापराला संमती दिली आहे. या प्रणालीचे सादरीकरण करतांना ट्रायचे चेअरमन आर.एस. शर्मा हेदेखील उपस्थित होते.

ट्रुब्लॉक या प्रणालीचा वापर करून कुणीही आपल्या मोबाईलवरील संवाद वहन, संदेशांची देवाण-घेवाण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ऑनलाईन व्यवहार हे अतिशय सुरक्षितपणे पार पाडू शकणार आहे. मोबाईल वा यावरील संदेश हॅक करून होणारे गैरप्रकार यामुळे संपुष्टात येतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय, स्पॅम मॅसेज, एसएमएस फ्रॉड आदींनाही यामुळे अटकाव करता येणार आहे. तानला सोल्युशन्स या कंपनीने आपल्या ट्रुब्लॉक सेवेचे लोकार्पण मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये केले. यासोबत सर्वप्रथम ही सेवा व्होडाफोन-आयडिया कंपनीतर्फे सुरू करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. याच कार्यक्रमात या सेवेच्या पहिल्या ग्राहकाबाबत माहितीसुध्दा देण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये व्होडाफोन-आयडिया कंपनी आपल्या ग्राहकांसाठी ट्रुब्लॉक सेवा सुरू करणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. तर लवकरच अन्य टेलकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांसाठीही ही सेवा प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती तानला सोल्युशन्स कंपनीने दिली आहे. यात ब्लॉकचेनला आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स (कृत्रीम बुध्दीमत्ता) व मशिन लर्नींग या प्रणालींची जोडदेखील देण्यात आली आहे.

ट्रुब्लॉक प्रणाली ही मोबाईल युजर्ससह व्यावसायिक सेवा पुरवठादार, टेलकॉम कंपन्या, ट्रायसारख्या नियामक संस्था आदी सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे कुणीही युजर त्याने सबस्क्राईब न केलेल्या सेवांच्या टेली मार्केटींग कंपन्यांचे कॉल्स वा एसएमएसपासून मुक्तता मिळवू शकतो. याच्या माध्यमातून मोबाईल युजरला एंड-टू-एंड एनक्रिप्शन या प्रकारातील संदेश वहनाप्रमाणेच सुरक्षा कवच मिळणार असून ही प्रणाली क्रांतीकारक मानली जात आहे. याचा वैयक्तीक आणि व्यावसायीक या दोन्ही पातळ्यांवर उपयोग होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here