ओप्पो ए ७ स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंट सादर

0

ओप्पो कंपनीने आपल्या ए ७ या अलीकडेच सादर केलेल्या स्मार्टफोनचे नवीन व्हेरियंट बाजारपेठेत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

ओप्पो ए ७ हा स्मार्टफोन गत नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आला होता. पहिल्यांदा याला ४ जीबी रॅम+६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायात व १६,९९० रूपये मूल्यात सादर करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेजच्या पर्यायात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. याचे मूल्य १४,९९० रूपये असून याला अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, पेटीएम आदी ऑनलाईन पोर्टल्सवरून खरेदी करता येणार आहे. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच असणार आहेत.

ओप्पो ए७ या मॉडेलमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. यात फ्रंट कॅमेरा आणि सेन्सर्सचा समावेश करण्यात आला आहे. या लहानशा नॉचमुळे यातील डिस्प्ले हा खर्‍या अर्थाने फुल व्ह्यू या प्रकारातील असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हा डिस्प्ले ६.२ इंच आकारमानाचा असणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे.

ओप्पो ए७ या स्मार्टफोनमध्ये ४,२३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती प्रदीर्घ काळ बॅकअप देण्यास सक्षम आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडपासून विकसित करण्यात आलेल्या कलरओएस ५.२ या प्रणालीवर चालणारा आहे. याच्या मागील बाजूस १३ व २ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील फ्रंट कॅमर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्ता व ब्युटिफिकेशन फिचरने युक्त असणारा १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here