फेसबुकच्या व्हिडीओजमध्ये अ‍ॅड ब्रेक…कमाईची नामी संधी !

0

फेसबुकच्या व्हिडीओजमध्ये आता अ‍ॅड ब्रेक येणार असून या माध्यमातून व्हिडीओ निर्मार्त्यांना उत्पन्नाचा नवीन स्त्रोत मिळणार आहे.

सध्या जगभरात व्हिडीओज मोठ्या प्रमाणात पाहिले जात असून याचे शेअरिंगही मोठ्या प्रमाणात होत आहे. मध्यंतरी फेसबुकने या क्षेत्रातील युट्युबच्या मिरासदारीला आव्हान देण्याचे जोरदार प्रयत्न केले. याला मर्यादीत प्रमाणात यशदेखील लाभले. मात्र युट्युबने जोरदार आगेकूच करत व्हिडीओ शेअरिंगमधील आपले स्थान अतिशय मजबूत केले आहे. अमेरिकेत तर युट्युबने फेसबुकला मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, व्हिडीओज शेअरींगला फेसबुकने प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. या अनुषंगाने आता भारतीय युजर्ससाठी अ‍ॅड ब्रेक ही सुविधा देण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात इंग्रजी व हिंदीसह बंगाली, तामिळ आणि मल्याळम भाषांमधील व्हिडीओजला ही सुविधा देण्यात आलेली आहे.

फेसबुकच्या अ‍ॅड ब्रेक या प्रणालीच्या सुविधेसाठी संबंधीत व्हिडीओ हा किमान तीन मिनिटांचा असावा अशी अट टाकण्यात आली आहे. यात व्हिडीओ अपलोड करणारा युजर हा जाहिराती नेमक्या कुठे असाव्यात याची निवड करू शकणार आहे. याशिवाय, जाहिराती दाखविण्याचा पर्याय ऑफ करण्याची सुविधादेखील यात देण्यात आली आहे. या जाहिरातींमुळे युट्युबप्रमाणेच कुणीही फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून यापासून उत्पन्न कमावू शकणार आहे. दरम्यान, यासोबत फेसबुकने ब्रँड कोलॅब्ज मॅनेजर हे टुलदेखील उपलब्ध केले आहे. याच्या मदतीने आघाडीच्या ब्रँडला व्हिडीओ निर्मार्त्यांबद्दल सहजपणे माहिती मिळू शकणार आहे. यामुळे संबंधीत व्हिडीओच्या निर्मार्त्यांना ब्रँडसोबत सुलभपणे सहकार्य करता येणार आहे. भारतीय युजर्ससाठी अ‍ॅड ब्रेक हे फिचर तात्काळ कार्यान्वित करण्यात आलेले असले तरी ब्रँड कोलॅब्ज मॅनेजर हे पुढील वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध करण्यात येणार आहे.

फेसबुकने अ‍ॅड ब्रेक या प्रणालीत सहभागी होण्यासाठी दिलेले निकष हे तुलनेत खूप कठोर असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. १० हजार वा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असणार्‍या पेजेसलाच ही सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी गत ६० दिवसांमध्ये किमान ३० हजार इतके व्हिडीओजचे व्ह्यूज असण्याची अटदेखील टाकण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व व्हिडीओज किमान एक मिनिटापर्यंत पाहिलेले असावेत हेदेखील सांगण्यात आले आहे. कुणालाही फेसबुकच्या अ‍ॅड ब्रेकमध्ये या लिंकवर क्लिक करून सहभागी होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here