अँड्रॉइड स्मार्टफोनवर पासवर्ड होणार इतिहासजमा

0

गुगलने आज अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाची घोषणा करून आता पासवर्डच्या कटकटीपासून मुक्तता करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

सायबर विश्‍वात वावरतांना पासवर्ड हा सर्वात महत्वाचा आणि तसाच सर्वात दुर्लक्षीत असा विषय आहे. अनेक जण पासवर्ड लक्षात ठेवण्याची कटकट नको म्हणून एकच पासवर्ड हा अनेक सेवांसाठी वापरतात. यापेक्षा भयंकर प्रकार म्हणजे बहुतांश युजर्स हे अतिशय सोपे पासवर्ड वापरत असून ते सहजपणे ओळखता येतात. यामुळे अर्थातच अकाऊंट हॅक होण्यापासून ते पैशांवर डल्ला मारण्याचे प्रकार सर्रास होत असतात. मात्र गुगलने आज बार्सिलोना शहरात सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये केलेली एक घोषणा ही अतिशय महत्वपूर्ण ठरू शकते. यानुसार आता गुगलने अँड्रॉइडची ७.० अर्थात नोगट वा त्यावरील आवृत्ती वापरणार्‍या युजर्सला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड वापरण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. यासाठी गुगलने फिडो २ या मानकासोबत सहकार्याचा करार केला आहे.

फिडो २ या प्रणालीच्या मदतीने पासवर्डच्या पलीकडे जाऊन विविध सेवा (उदा. अ‍ॅप्स, गेम्स, संगणक) आदींवर लॉगीन करण्याची सुविधा आधीच देण्यात आली आहे. यापुढे अँड्रॉइड (७.० वा त्यावरील युजर्स) युजर्सला ही सेवा डिफॉल्ट पध्दतीत प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक सेवेला (उदा ई-मेल, अ‍ॅप्स आदी) स्वतंत्र पासवर्ड ठेवण्याच्या कटकटीपासून मुक्तता होणार आहे. याऐवजी संबंधीत युजर हा त्याच्या फिंगरप्रिंट स्कॅनर, स्क्र्रीन लॉक वा अन्य ऑथेंटीकेशन प्रणालीला संलग्न करू शकतो. म्हणजे एकदा का फिंगरप्रिंट स्कॅनर करून स्मार्टफोन ओपन केला की, यातील क्रोम ब्राऊजर, युट्युब, फेसबुक आदींसह अन्य सेवांसाठी स्वतंत्र लॉगीन करावे लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here