मोटो जी ७ पॉवर स्मार्टफोन भारतात दाखल

0

मोटोरोलाने अलीकडेच अनावरण केलेला मोटो जी ७ पॉवर हा स्मार्टफोन आता भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे.

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोलाने अलीकडेच जी ७ या मालिकेत चार नवीन मॉडेल्स लाँच केले होते. हे मॉडेल्स पहिल्यांदा ब्राझीलमध्ये मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर काही दिवसांमध्येच यापैकी मोटो जी७ पॉवर हा स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. मुंबई येथील ख्यातमान रिटेलर महेश टेलकॉम यांच्यातर्फे याबाबत एका ट्विटच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. यानुसार या स्मार्टफोनचे मूल्य १८,९९९ रूपये असले तरी महेश टेलकॉममध्ये हे मॉडेल १४,५०० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. अर्थात, पहिल्या टप्प्यात हा स्मार्टफोन ऑफलाईन पध्दतीत सादर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याला पहिल्यांदा सिरॅमिक ब्लॅक या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे.

मोटो जी७ पॉवर या मॉडेलची खासियत म्हणजे यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ६० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यासाठी कंपनीने स्वतंत्र १५ वॅट क्षमतेचे टर्बो चार्जरदेखील दिले आहे. स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१५७० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा मॅक्स व्हिजन या प्रकारातील डिस्प्ले असून यावर नॉच दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी व स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यात १२ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे देण्यात आले आहेत. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here