ऑनर वॉच मॅजिक व बँड ४ रनिंग एडिशन सादर

0

ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी वॉच मॅजिक हे स्मार्टवॉच व बँड ४ रनिंग एडिशन हा फिटनेस बँड सादर करण्याची घोषणा केली आहे.

हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने व्ह्यू मॅजिक हा स्मार्टफोन सादर करतांनाच वॉच मॅजिक हे स्मार्टवॉच व बँड ४ रनिंग एडिशन हा फिटनेस बँडदेखील बाजारपेठेत सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे १३,९९९/१४९९९९ आणि १,५९९ रूपये असून याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील वॉच मॅजिक हे स्मार्टवॉच नॉर्मल व प्रिमीयम स्पोर्टस या दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे या मॉडेलमध्ये ५एटीएम या प्रणालीचा वापर करण्यात आला असून यामुळे हे स्मार्टवॉच खर्‍या अर्थाने वॉटरप्रूफ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये १.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा टचस्क्रीन डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. चालणे, धावणे, सायकलींग, व्यायाम, पोहणे, गिर्यारोहण आदी शारिरीक घडामोडींचे अचूक मापन करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. तर यातील टु्रस्लीप २.० या प्रणालीच्या मदतीने आठ भिन्न प्रकारांमध्ये निद्रेचे मापन करता येणार आहे. या स्मार्टवॉचच्या मदतीने रक्तदाबाचे मापनदेखील करता येणार असून यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सात दिवसांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

तर ऑनर बँड ४ रनिंग एडिशन हा फिटनेस ट्रॅकर असून आधी उपलब्ध असणार्‍या ऑनर बँड ४ या मॉडेलची नवीन आवृत्ती आहे. यामध्ये पीएमओएलईडी या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. अर्थात आधीच्या आवृत्तीपेक्षा हा डिस्प्ले थोडा भिन्न आहे. यात ६-अ‍ॅक्सीस या प्रकारातील सेन्सर दिलेले असून ते अन्य फिटनेस ट्रॅकरप्रमाणे विविध फंक्शन्स पार पाडण्यासाठी सक्षम आहेत. तथापि, यामध्ये हार्ट रेट मॉनिटर दिलेले नाही. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर १२ दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here