गुगल नेस्ट हब भारतात सादर

0

गुगलने नेस्ट हब हा स्मार्ट डिस्प्ले भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

गुगलने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नेस्ट हब हा स्मार्ट डिस्प्ले सादर केला होता. यानंतर याची नेस्ट हब मॅक्स ही पुढील आवृत्ती या वर्षीच्या आय/ओ परिषदेत सादर करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमिवर, आता नेस्ट हब हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर शिक्कामोर्तब करत कंपनीने हे उपकरण भारतात लाँच केले आहे. याचे मूल्य ९,९९९ रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट, अमेझॉन इंडिया, टाटा क्लिक, क्रोमा, रिलायन्स डिजीटल येथून खरेदी करू शकतो. दरम्यान, ग्राहकांनी हे मॉडेल फ्लिपकार्ट आणि टाटा क्लिकवरून खरेदी केल्यास यासोबत १,७७७ रूपये मूल्य असणारा शाओमीचा मी सिक्युरिटी कॅमेरा मोफत मिळणार आहे.

यात वाय-फाय कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून इंटरनेटच्या मदतीने हा स्मार्ट डिस्प्ले विविध फंक्शन्स पार पाडेल. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यावरून व्हिडीओ बघता येणार आहे. याला फोटो फ्रेम म्हणूनदेखील वापरता येणार आहे. तसेच याला घरातील अन्य उपकरणांशी कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. जगभरातील तब्बल ३५०० कंपन्यांच्या विविध प्रॉडक्टला याच्याशी कनेक्ट करून नियंत्रीत करता येणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. यात शाओमी, एलजी, फिलीप्स आदींसारख्या ख्यातप्राप्त कंपन्यांच्या उपकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्वांचे नियंत्रण नेस्ट हबवरून करता येईल. यासाठी स्वतंत्र स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशनदेखील सादर करण्यात आलेले आहे.

नेस्ट हब या उपकरणांमध्ये गुगल असिस्टंट हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आला आहे. यामुळे युजर ओके गुगल अथवा हे गुगल म्हणून याला ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांड देऊ शकतो. यावरून वेब सर्फींग करण्यासह वाहतुकीचे अलर्ट, विविध नोटिफिकेशन्स, हवामानाची माहिती आदींची माहिती युजर मिळवू शकतो. गुगल नेस्ट हबला बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी अमेझॉनच्या इको शो या उपकरणाशी तीव्र स्पर्धा करावी लागणार आहे.

पहा : गुगलच्या नेस्ट हबची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here