युजर्सच्या पासवर्ड सुरक्षेसाठी गुगलचे नवीन टुल

0
new-google-logo

सायबर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असतांना गुगलने पासवर्ड सुरक्षित रहावा यासाठी क्रोम या ब्राऊजरसाठी एक्सटेन्शनच्या स्वरूपात नवीन टुल सादर केले आहे.

सध्या सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कितीही काळजी घेतली तरी माहितीच्या चोरीपासून कुणीही सुरक्षित राहू शकत नसल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यात विशेष करून थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्स आणि टुल्सच्या माध्यमातून होणार्‍या माहिती चोरीचे प्रकार वाढीस लागले आहेत. यासाठी कंपन्यांनी नवनवीन सुविधा देण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आता गुगलनेही पुढाकार घेतला आहे. सर्च क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या गुगलने आता पासवर्ड चेकअप या नावाने नवीन टुल युजर्ससाठी उपलब्ध केले आहे. हे टुल क्रोम या ब्राऊजरवरील एक्सटेन्शनच्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे. अर्थात युजरला हे टुल इन्स्टॉल करावे लागणार आहे.

एकदा पासवर्ड चेकअप हे टुल इन्स्टॉल केले की, युजर निर्धास्त राहू शकतो असा दावा गुगलने केला आहे. याचा उपयोग करून संबंधीत युजरचे सर्व लॉगीन आयडी व पासवर्ड सुरक्षित आहे का ? याबाबतची माहिती कळू शकणार आहे. थर्ड पार्टी सेवांच्या माध्यमातून त्या युजरच्या माहिती चोरीचा प्रयत्न होत असल्यास याची माहितीदेखील त्याला मिळणार आहे. तसेच युजरने स्वत: पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केल्यासही त्याला अलर्टच्या स्वरूपात इशारा देण्यात येणार आहे. गुगल आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या विकसित केलेल्या क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानाच्या मदतीने पासवर्ड चेकअप हे एक्सटेन्शन विकसित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here