फेसबुक लाईट अ‍ॅपचे एक अब्ज डाऊनलोड

0

खास करून संथ इंटरनेटसाठी सादर करण्यात आलेल्या फेसबुक लाईट या अ‍ॅपने एक अब्ज डाऊनलोडचा महत्वाचा टप्पा पार केला आहे.

जगातील अनेक देशांमधील युजर्ससाठी विविध कंपन्यांनी आपापल्या अ‍ॅप्सच्या लाईट आवृत्त्या सादर केल्या आहेत. संथ इंटरनेट ही जगातल्या अनेक भागातील समस्या आहे. विशेषत: अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये अद्यापही इंटरनेटला चांगला स्पीड मिळत नाही. यामुळे स्मार्टफोनवरून फेसबुकचा वापर करण्यात अनेक अडचणी येतात. याची दखल घेऊन फेसबुक लाईट हे स्वतंत्र अ‍ॅप्लीकेशन मार्च २०१६ मध्ये लाँच करण्यात आले होते. नावाप्रमाणेच हे ऍप लहान तर आहेच पण याच्या मदतीने संथ गतीने इंटरनेट असतांनाही फेसबुकच्या सर्व फंक्शन्सचा वापर करता येणार आहे. फेसबुकच्या विद्यमान अ‍ॅप्लीनेशची साईज सुमारे ३० मेगाबाईटस् आहे. फेसबुक लाईट मात्र अवघ्या एक मेगाबाईटचे असून यात सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने संथ गतीने चालणार्‍या टु-जी नेटवर्कवरही फेसबुकच्या सर्व फंक्शन्सची मजा लुटता येणार असल्याचे फेसबुकने नमूद केले होते.

फेसबुकच्या अ‍ॅपची लाईट आवृत्ती युजर्सला चांगलीच भावल्याचे दिसून येत आहे. यामुळे या अ‍ॅपने गुगल प्ले स्टोअरवर तब्बल एक अब्ज डाऊनलोडचा महत्वाचा टप्पा पार केला आहे. विशेष करून अतिशय कमी वेळात या अ‍ॅपचे एक अब्ज डाऊनलोड झाल्याची बाब महत्वपूर्ण मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here