हा आहे…सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोन !

0

सॅमसंगने अखेर आपला फोल्ड होणारा स्मार्टफोन सादर केला असून याला पहिल्या टप्प्यात डेव्हलपर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

गत अनेक महिन्यांपासून फोल्ड अर्थात घडी होणारा स्मार्टफोन हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. गत वर्षी झेडटीई कंपनीने तर अलीकडेच रॉयल या कंपनीने या प्रकारातील फ्लेक्सपाय हे मॉडेल लाँच केले आहेत. यातच अलीकडच्या काळात सॅमसंग कंपनी याच प्रकारातील मॉडेल सादर करणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे याबाबतची उत्सुकता ताणली गेली होती. काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने या अनुषंगाने सादर केलेला टिझरदेखील चर्चेचा विषय बनला होता. यातच आता सॅमसंगने आपल्या वार्षीक डेव्हलपर्स कॉन्फरन्सच्या पहिल्या दिवशी या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे. याचे नाव आणि मूल्य याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सॅमसंग एक्स अथवा सॅमसंग एफ यापैकी एका नावाने याला पुढील वर्षाच्या प्रारंभी जागतिक बाजारपेठेत उतारण्यात येणार आहे.

सॅमसंगच्या हा फोल्ड होणार्‍या स्मार्टफोनला उघडले असता, यात ७.३ इंच आकारमानाचा अर्थात एखाद्या टॅबलेटप्रमाणे डिस्प्ले म्हणून वापर करता येणार आहे. तर फोल्ड केल्यानंतर याचा डिस्प्ले तुलनेत लहान होणार आहे. अर्थात स्मार्टफोन आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये याला वापरता येणार आहे. यात इन्फीनिटी फ्लेक्स डिस्प्ले वापरण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या उपकरणाचा अन्य तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. तथापि, हे मॉडेल पहिल्या टप्प्यात फक्त डेव्हलपर्ससाठी सादर करण्यात येणार आहे. अलीकडच्या काळात स्मार्टफोनमुळे टॅबलेटच्या विक्रीत लक्षणीय घट होत आहे. एकीकडे स्मार्टफोन हा अगदी एखाद्या संगणकाप्रमाणेच वेगवान होत असतांना याचा स्क्रीन वाढविण्याचा प्रयत्न सॅमसंगने या फोल्ड होणार्‍या स्मार्टफोनमधून केल्याचे मानले जात आहे. तज्ज्ञांच्या मते सॅमसंगला या प्रयत्नात यश लाभले तर ही कंपनी नव्या उत्साहाने मार्गक्रमण करणार आहे. या स्मार्टफोनसाठी अँड्रॉइडने स्वतंत्र युजर इंटरफेस तयार केला आहे. अँड्रॉइडच्या आगामी डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये फोल्ड होणार्‍या स्मार्टफोनच्या सपोर्टबाबत सविस्तर उहापोह करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here