स्मार्टफोनमध्ये असेल ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा !

0
सोनी स्मार्टफोन कॅमेरा, sony camera

सोनी कंपनीने स्मार्टफोनसाठी नवीन सेन्सर तयार केले असून यामुळे लवकरच स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्मार्टफोनमध्ये कॅमेरा हा अतिशय महत्वाचा घटक मानला जातो. बहुतांश स्मार्टफोन्समध्ये पुढील आणि मागील बाजूस दर्जेदार कॅमेरा असतो. किंबहुना चांगला कॅमेरा हा संबंधीत मॉडेलच्या यशासाठी एक महत्वाचा घटक मानला जातो. आणि इमेज सेन्सरवरूनच कोणत्याही स्मार्टफोनमधील कॅमेर्‍याची गुणवत्ता ठरत असते. जगात अनेक इमेज सेन्सर उत्पादक आहेत. यात सोनी, सॅमसंग आदी कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्या वेळोवेळी नवनवीन इमेज सेन्सर्स तयार करत असतात. हेच सेन्सर्स विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्समध्ये वापरले जातात. या अनुषंगाने सोनी कंपनीने आता आयएमएक्स५८६ सीएमओएस इमेज सेन्सरची निर्मिती केली आहे. यात तब्बल ४८ मेगापिक्सल्स म्हणजेच ८,००० बाय ६,००० पिक्सल्स क्षमतेची छायाचित्रे घेता येणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याचा वापर करून फोर-के म्हणजेच ४०९० बाय २१६० पिक्सल्स क्षमतेचे आणि ९० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीने व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. यासोबत यात ३० फ्रेम्स प्रति-सेकंद इतक्या गतीनेही चित्रीकरण करता येणार असल्याचे सोनी कंपनीने जाहीर केले आहे.

सोनी कंपनीचे हे नवीन सेन्सर आकाराने अतिशय लहान असून याचे मूल्यदेखील फार जास्त नाही. यामुळे याला विविध स्मार्टफोन्समध्ये सहजपणे वापरता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये क्वॉड बायर हे कलर फिल्टर वापरण्यात आले आहे. यामुळे अगदी सजीव वाटणार्‍या प्रतिमा काढता येणार आहेत. यात डीप सिग्नल प्रोसेसींगदेखील प्रदान करण्यात आलेली आहे. सप्टेबर महिन्यात हे नवीन प्रोसेसर स्मार्टफोन्स उत्पादकांना उपलब्ध केले जाणार आहे. यामुळे यावर आधारित स्मार्टफोन्स लवकरच येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दरम्यान, सोनी कंपनी लवकरच एक्सपेरिया एक्सझेड ३ हा स्मार्टफोन लाँच करणार असून यात हा ४८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा सर्वप्रथम वापरला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. बर्लीन शहरात होणार्‍या आयएफए-२०१८ मध्ये याला पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात येणार आहे.