स्मार्टफोनच्या केसमध्ये वाय-फाय कॅमेरा

0

स्मार्टफोनच्या केसमध्ये वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणारा कॅमेरा असू शकतो यावर आपला विश्‍वास बसणार नाही. तथापि, एका कंपनीने ही किमया करून दाखविली आहे.

जगातील बहुतांश युजर्स हे आपल्या स्मार्टफोनच्या संरक्षणासाठी स्वतंत्र केस वापरतात. यामुळे स्मार्टफोनच्या पुढील वा मागील अथवा दोन्ही बाजूंचे संरक्षण होत असते. याच बाह्य केसमध्ये स्वतंत्र कॅमेरा देण्याची अफलातून आयडिया आता प्रत्यक्षात साकार झाली आहे. एबलटेक कंपनीने इव्हो गो कॅमच्या माध्यमातून या प्रॉडक्टला ग्राहकांसाठी सादर केले आहे. हे प्रत्यक्षात स्मार्टफोनचे आवरण (केस) असून यामध्ये वायरलेस कॅमेरा फिट करण्यात आला आहे. हा कॅमेरा केसच्या मागील बाजूच्या सॉकेटमध्ये फिट बसू शकतो.

हा कॅमेरा अवघ्या ६ मिलीमीटर जाडीचा म्हणजेच सुपरस्लीम या प्रकारातील आहे. याची क्षमता ५ मेगापिक्सल्सची असून यात ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करता येते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा कोणत्याही पार्श्‍वभागावर अगदी सुलभपणे चिपकवता येतो. यातून रेकॉर्ड करण्यात आलेले चित्रीकरण एसडी कार्डमध्ये सेव्ह करता येते. तसेच यामध्ये इनबिल्ट वाय-फायची सुविधा असल्यामुळे ते ४६ मीटर अंतरापर्यंत प्रक्षेपित करता येते. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. यात हा कॅमेरा करत असलेले चित्रीकरण पाहता येते. याला सोशल मीडियात शेअरदेखील करता येते. याला सेल्फी कॅम, अ‍ॅक्शन कॅम, बेबी मॉनिटर, डॅश कॅम, पार्कींग कॅमेरा आदी विविध प्रकारांमध्ये वापरणे शक्य आहे. बाजारपेठेतील बहुतांश अँड्रॉइड व आयओएस प्रणालींवर चालणार्‍या स्मार्टफोनमध्ये याला वापरता येणार आहे.

हा कॅमेरा सध्या इंडिगोगो या क्राऊडफंडींग करणार्‍या संकेतस्थळावर सादर करण्यात आला आहे. येथे याची अगावू नोंदणी ८९ डॉलर्समध्ये करता येणार आहे. तर लवकरच बाजारपेठेत हे मॉडेल १४९ डॉलर्सला मिळणार आहे.

पहा : इव्हो गो कॅमची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here