सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए बाजारपेठेत दाखल

0

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्टी टॅब ए या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली असून यात कंपनीने विकसित केलेला बिक्सबी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलमधील विशेष फिचर म्हणजे बिक्सबी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट होय. सॅमसंग कंपनीच्या काही फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये हा असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. आता सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलच्या माध्यमातून टॅबलेटवरही हा असिस्टंट वापरता येणार आहे. हे या मॉडेलचे वैशिष्ट्य ठरणार आहे. तर यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची जंबो बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळपर्यंत चालत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. म्हणजेच ही जंबो बॅटरी या टॅबलेटचे प्रमुख फिचर असेल.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलमध्ये ८ इंच आकारमानाचा डब्ल्यूएक्सजीए (१२८० बाय ८०० पिक्सल्स) क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून यात एलईडी फ्लॅश आणि एफ/१.९ अपार्चर असेल. तर यात एफ/२.२ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर सॅमसंग कंपनीचा टचविझ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या टॅबलेटमध्ये फोर-जी एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ आणि वाय-फाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी असून सोबत जीपीएस/ए-जीपीएस, ग्लोनास आदी फिचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) हा टॅबलेट ग्राहकांना ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून याचे मूल्य १७,९९९ रूपये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here