सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस४ ची एंट्री; एकाहून एक सरस फिचर्सचा समावेश

0
सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस४, samsung galaxy tab s 4

सॅमसंगने आज आपल्या गॅलेक्सी टॅब एस ४ या टॅबलेटचे अनावरण केले असून बाजारपेठेत हे मॉडेल लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गॅलेक्सी टॅब एस ४च्या आगमनाबाबत उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले होते. सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी नोट ९ या मॉडेलसोबत याला लाँच करणार असल्याची चर्चा होती. तथापि, याआधीच कंपनीने या नवीन मॉडेलचे अनावरण केले आहे. गत वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी टॅब एस ३ या मॉडेलची ही अद्ययावत आवृत्ती असणार आहे. हे हायब्रीड कन्व्हर्टीबल अर्थात टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल आहे. यामुळे याला टॅबलेट आणि लॅपटॉप या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. पहिल्यांदा याला अमेरिकन बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार असून याचे मूल्य ६४९.९९ डॉलर्स म्हणजेच अंदाजे ४४,४०० रूपये इतके आहे. सूत्रांच्या माहितीनुसार याला लवकरच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येणार आहे.

गॅलेक्सी टॅब एस४ या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकारमानाचा आणि क्वॉड एचडी अर्थात २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा तथा १६:१० अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये डाॅल्बी अ‍ॅटमॉस या प्रणालीने सज्ज असणारे चार स्पीकर्स असून याच्या मदतीने सुश्राव्य संगीताचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी असून स्टोअरेजसाठी ६४ आणि २५६ जीबी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारे आहे. यात यातील ७,३०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीमध्ये फास्ट चार्जींगचा सपोर्ट दिलेला आहे. याला एकदा चार्ज केल्यानंतर १६ तासांचा बॅकअप मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यामध्ये फेशियर रिकग्नीशन आणि आयरिस स्कॅनर प्रणालींचा समावेश करण्यात आलेला आहे. कनेक्टीव्हिटीसाठी यामध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस आदी पर्याय असून एलटीई नेटवर्कचे व्हेरियंटसुध्दा उपलब्ध करण्यात येणार आहे.

गॅलेक्सी टॅबची खासियत असणार्‍या स्टायलस पेनचा सपोर्ट या मॉडेलमध्येही प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने डिस्प्लेवर रेखाटन करता येणार असून नोटस्देखील घेता येणार आहे. सॅमसंगने पहिल्यांदाच आपल्या टॅबलेटमध्ये ‘सॅमसंग डेक्स’ या प्रणालीचा सपोर्ट दिला आहे. यामुळे याला मोठ्या डिस्प्लेशी सहजपणे कनेक्ट करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here