सॅमसंगचे सीमकार्डयुक्त स्मार्टवॉच दाखल

0
सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टवॉच, samsung smartwatch

सॅमसंगने सेल्युलर नेटवर्कचा सपोर्ट असणारे स्मार्टवॉच दोन व्हेरियंटमध्ये जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

सॅमसंगने आपल्या ग्लोबल लाँच कार्यक्रमात गॅलेक्सी नोट ८ या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनसोबत अन्य उपकरणांचेही अनावरण केले. यात सॅमसंग गॅलेक्सी वॉचचाही समावेश आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल म्हणजे स्मार्टवॉच आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये सीमकार्डचा सपोर्ट देण्यात आलेला आहे. यात एलटीई नेटवर्क कनेक्टीव्हिटी आहे. अर्थात यामध्ये कुणीही फोर-जी नेटवर्कवरून कॉलींग तसेच इंटरनेटचा वापर करू शकतो. अलीकडच्या काळात मोजक्या स्मार्टवॉचमध्ये ही सुविधा देण्यात आलेली आहे. अ‍ॅपलनेही आपल्या मॉडेलमध्ये याचा समावेश केला आहे. यामुळे सॅमसंगनेही आपल्या स्मार्टवॉच मॉडेलमध्ये याचा सपोर्ट दिल्याचे मानले जात आहे. यामुळे या स्मार्टवॉचवरून कॉलींगची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच युजर यावरून कॉल करू शकतो अथवा कॉल रिसिव्हदेखील करू शकतो. तसेच यावरून कुणीही एसएमएसची देवाण-घेवाणदेखील करू शकणार आहे.

सॅमसंगच्या स्मार्टवॉचमधील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात फिटनेस ट्रॅकरचे बहुतांश फिचर्स दिलेले आहेत. यात स्ट्रेस ट्रॅकर हे खास फिचर दिलेले आहे. याच युजरला तणाव जाणवल्यास त्याला श्‍वसनाशी संबंधीत व्यायाम सुचविले जातात. यामध्ये स्लीप ट्रॅकरदेखील दिलेले असून याच्या मदतीने निद्रेचे मापन करता येते. हे स्मार्टवॉच ४६ आणि ४२ मिलीमीटरच्या दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. यातील पहिल्या व्हेरियंटमध्ये १.३ तर दुसर्‍यात १.२ इंच आकारमानाचा ऑल्वेज ऑन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात येणार आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण देण्यात येणार आहे. याच्यासोबत बदलता येण्याजोगे अतिशय आकर्षक रंगाचे पट्टेदेखील देण्यात येणार आहेत. यात अनुक्रमे ४७२ आणि २७० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीज प्रदान करण्यात आल्या आहेत. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे ८० तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टवॉच याच कंपनीच्या वेअरेबल ओएस ४.० वर चालणारे आहेत. यात सॅमसंगचाच एक्झीनॉस ९११० हा प्रोसेसर असणार आहे. याची रॅम १.५ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी इतके आहे. तर याच्या ब्ल्युटुथ व्हर्जनमध्ये ७६८ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणार आहे. यात थ्रीजी/फोरजी नेटवर्क कनेक्टीव्हिटीसह ब्ल्युटथ, वाय-फाय, एनएफसी, जीपीएस, बॅरोमीटर, अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, अँबिअंट लाईट आदी फिचर्स देण्यात आले आहेत. पहिल्यांदा हे स्मार्टवॉच अमेरिका आणि दक्षिण कोरियात मिळणार असून सधारणत: पुढील महिन्यात भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here