सारेगामा कारवाची नवीन प्रिमीयम आवृत्ती

0
सारेगामा कारवा गोल्ड, saregama-carvaan-gold

सारेगामा कारवा गोल्ड ही नवीन उच्च श्रेणीतील आवृत्ती आता बाजारपेठेत उतारण्यात आली असून यात अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली देण्यात आलेली आहे.

सारेगामा कारवा हा डिजीटल म्युझिक प्लेअर तुफान लोकप्रिय झालेला आहे. याच्या विविध आवृत्त्यादेखील सादर करण्यात आल्या आहेत. यात आता सारेगामा कारवा गोल्ड या नवीन आवृत्तीची भर पडणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार या मॉडेलचे बाह्यांग सोनेरी रंगाचे असणार आहे. यासोबत यात काही नवीन फिचर्सची भर टाकण्यात आलेली आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे यात हर्मन कार्दोन या विश्‍वविख्यात ध्वनी प्रणालीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. खरं तर, सारेगामा कारवा या मॉडेलमध्ये आधीच अतिशय सुश्राव्य अशा ध्वनीचा सपोर्ट दिलेला आहे. यामुळे यातील गाण्यांच्या खजिन्याला डिजीटल स्वरूपात अनुभवण्याची सुविधा मिळालेली आहे. तथापि, यात हर्मन कार्दोनचा समावेश करण्यात आल्यामुळे ध्वनीची क्वॉलिटी ही अजून जास्त प्रमाणात वाढणार आहे. यासोबत या डिजीटल प्लेअरला अतिशय मजबूत अशी स्टील बॉडी प्रदान करण्यात आली आहे. तसेच याला आता कंपॅनियन अ‍ॅपचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे युजर आपल्या स्मार्टफोनला या अँड्रॉइड/आयओएस अ‍ॅपसोबत कनेक्ट करून हव्या त्या गाण्यांना ऐकू शकणार आहे.

वर नमूद केलेले नवीन फिचर्स वगळता सारेगामा कारवा गोल्डमध्ये आधीच्या मॉडेलनुसार सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात आधीप्रमाणेच अवीट गोडीच्या ५ हजार हिंदी गाण्यांचा संग्रह प्रदान करण्यात आलेला आहे. याला विविध वर्गवारींमध्ये विभाजीत करण्यात आले असून अगदी सहजपणे हवे ते गाणे ऐकण्याची सुविधा यात दिलेली आहे. यात विविध कलावंतांना समर्पीत असणारे जवळपास १३० पेक्षा जास्त स्वतंत्र चॅनल्स दिलेले आहेत. याशिवाय यामध्ये एएम आणि एफएम रेडिओ इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेला आहे. यात ब्ल्यु-टुथ आणि युएसबी कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. यातील बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पाच तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सारेगामा कारवा गोल्ड हा डिजीटल प्लेअर १४,९९० रूपये मूल्यात ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. याला सारेगामाच्या अधिकृत ऑनलाईन स्टोअरवरून खरेदी करता येणार आहे. यासोबत एक वर्षाची वॉरंटीदेखील मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here