शाओमी रेडमी ६, रेडमी ६ ए मॉडेल्सचे अनावरण

0

शाओमी कंपनीने आपल्या रेडमी या मालिकेत रेडमी ६ आणि रेडमी ६ ए हे दोन नवीन मॉडेल्स बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यांचे अनावरण करण्यात आले.

शाओमीने आपल्या आजच्या ग्लोबल लाँचीग कार्यक्रमात रेडमी ६ आणि रेडमी ६ ए हे दोन मॉडेल्स सादर केले. शाओमी कंपनीच्या आजवरच्या पॅटर्ननुसार यातही किफायतशीर दरात अतिशय दर्जेदार फिचर्स देण्यात आले आहेत. या दोन्ही मॉडेल्समधील बहुतांश फिचर्स समान असले तरी प्रोसेसरसह कॅमेर्‍यांच्या क्षमतेत थोडा बदल करण्यात आला आहे. शाओमी रेडमी ६ या मॉडेलमध्ये ५.४५ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा, फुल व्ह्यू या प्रकारातील तसेच एचडी प्लस म्हणजेच १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये हेलीओ पी २२ प्रोसेसर दिलेला आहे. याचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट उपलब्ध करण्यात आले आहेत. या दोन्ही व्हेरियंटमधील स्टोअरेज वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १२ आणि ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. याच्याच मदतीने यामध्ये फेस अनलॉक हे फिचरदेखील प्रदान करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा असून यावर शाओमी कंपनीचा मीयुआय १० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी ६ ए या मॉडेलमध्ये डिस्प्ले तोच असला तरी हेलिओ ए २२ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस १३ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून यातदेखील फेस अनलॉक फिचर देण्यात आले आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. शाओमी रेडमी ६ आणि शाओमी रेडमी ६ ए हे दोन्ही मॉडेल्स पहिल्यांदा चीनमध्ये उपलब्ध करण्यात आले असून ते लवकरच भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात येतील असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here