शाओमीचा सेल्फी स्टीक ट्रायपॉड व ऑडिओ रिसिव्हर

0

शाओमीने आपल्या मी क्राऊडफंडींग या साईटवर सादर केलेला सेल्फी स्टीक ट्रायपॉड आणि ब्ल्यु-टुथ ऑडिओ रिसिव्हर आता भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

शाओमी कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या मी क्राऊडफंडींग या सेवेला भारतात सुरू केले होते. याच्या माध्यमातून कुणीही कंपनी आपापल्या आगामी प्रॉडक्टसाठी लोकसहभागातून भांडवल उभारणी करू शकतात. यात शाओमीनेच प्रारंभी आपली काही उत्पादने सादर केली होती. यामध्ये सेल्फी स्टीक ट्रायपॉड आणि ब्ल्यु-टुथ ऑडिओ रिसिव्हरचा समावेश होता. आता हेच प्रॉडक्ट सर्व ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.

शाओमीचा मी सेल्फी स्टीक ट्रायपॉड हे अतिशय भन्नाट प्रॉडक्ट आहे. अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे याच्याशी संबंधीत अ‍ॅसेसरीजची मागणीदेखील वाढली आहे. यात सेल्फी स्टीक सर्वात लोकप्रिय आहे. याच्या माध्यमातून अतिशय सुलभपणे व विस्तृत क्षेत्रफळातील सेल्फी काढता येत असल्यामुळे ग्राहकांची याला पसंती मिळाली आहे. यासोबत अनेकदा स्मार्टफोनच्या मदतीने स्थिर व्हिडीओ चित्रीकरण वा प्रतिमा काढण्यासाठी ट्रायपॉडची आवश्यकताही भासते. नेमक्या याच बाबींचा विचार करून शाओमीने आपल्या सेल्फी स्टीक ट्रायपॉडमध्ये या दोन्ही सुविधा प्रदान केल्या आहेत. याच्याशी अटॅच करण्यात आलेला स्मार्टफोन ३६० अंशातून फिरवण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात सध्या बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या सर्व आकारमानांचे स्मार्टफोन सहजपणे संलग्न करता येणार आहेत. याला ब्ल्यु-टुथ रिमोट देण्यात आले असून याच्या मदतीने स्मार्टफोनला दुरवरून नियंत्रीत करता येईल. अँड्रॉइड प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोनमध्ये याला वापरता येणार आहे. याचे मूल्य १,०९९ रूपये असून मी.कॉम आणि शाओमीच्या रिटेल शॉपीजमधूनही याला खरेदी करता येणार आहे.

दरम्यान, शाओमीने मी ब्ल्यु-टुथ ऑडिओ रिसिव्हर हे उपकरणदेखील सर्व ग्राहकांना उपलब्ध केले आहे. सध्या स्मार्टफोनसारख्या उपकरणाच्या माध्यमातून संगीत ऐकण्याला वाढीव प्राधान्य मिळत आहे. मात्र स्मार्टफोनला हेडफोन वा इयरफोन कनेक्ट केला असता याचा अन्य वापर करता येत नाही. नेमकी हीच समस्या लक्षात घेत शाओमीने हे उपकरण लाँच केले आहे. यात स्मार्टफोनसह अन्य उपकरणे ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येतात. एकाच वेळी दोन उपकरणे कनेक्ट करण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. यावरील संगीत आपण इयरफोनमध्ये ऐकू शकतो. आणि हा इयरफोन या उपकरणाला कनेक्ट करण्यासाठी ऑडिओ जॅक देण्यात आले आहे. यामध्ये ९७ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पाच तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे उपकरण ग्राहकांना ९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले असून मी.कॉम आणि शाओमी शॉपीजमधून मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here