व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर येणार प्रिव्ह्यू फिचर

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर लवकरच प्रिव्ह्यू हे नवीन फिचर येणार असून याच्या मदतीने फेकन्यूजला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

व्हाटसअ‍ॅपवर सध्या नवनवीन फिचर्स देण्यात येत आहेत. सध्या संपूर्ण जगभरातील युजर्सला स्टीकर्सच्या वापराने अक्षरश: वेड लावलेले आहे. याचा वापर अतिशय विपुल प्रमाणात करण्यात येत आहे. यातच आता या मॅसेंजरवर अजून एक नवीन फिचर दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे फिचर प्रिव्ह्यू या नावाने दाखल होणार आहे. याबाबत व्हाटसअ‍ॅपतर्फे माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, व्हाटसअ‍ॅपच्या सर्व फिचर्सबाबत अतिशय अचूकपणे भाकित करणार्‍या WABetaInfo या संकेतस्थळाने प्रिव्ह्यूबाबतची माहिती दिलेली आहे. यानुसार येत्या काही दिवसांमध्ये हे फिचर युजर्सला वापरण्यासाठी देण्यात येणार आहे.

सध्या सोशल मीडियात फेक न्यूज हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. व्हाटसअ‍ॅपदेखील याला अपवाद नाही. या मॅसेंजरवरूनदेखील मोठ्या प्रमाणात फेकन्यूजची देवाण-घेवाण होत असते. याला आळा घालण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. अलीकडेच व्हाटसअ‍ॅपने फास्ट फॉरवर्डवर मर्यादा घालून या दिशेने एक पाऊल उचलले आहे. मात्र याच एका प्रयत्नाने फारसा फरक पडणार नसल्याची बाब उघड आहे. यामुळे नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन प्रिव्ह्यू हे फिचर काम करणार आहे. यात कोणताही ग्रुप अथवा वैयक्तीक चॅटींगमध्ये एखादी पोस्ट शेअर करण्याआधी याचा प्रिव्ह्यू दिसणार आहे. या वेळेत संबंधीत लिंकवरील माहिती ही खरी नसल्याचे लक्षात आल्यास संबंधीत युजर याला पाठविण्याआधीच डिलीट करू शकणार आहे. अगदी लिंक शेअर करण्याच्या प्रक्रियेतही तो याचा विचार रद्द करू शकतो. यामुळे व्हाटसअ‍ॅपवरील फेक कंटेंटला आळा बसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे फिचर येत्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदा बीटा अर्थात प्रयोगात्मक आवृत्तीसाठी सादर करण्यात येणार असून नंतर याला सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here