व्हाटसअ‍ॅप नरमले; आरबीआयच्या नियमासमोर झुकवली मान !

0
whatsapp,व्हाटसअ‍ॅप

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने अखेर आरबीआयच्या नियमानुसार आपल्या ग्राहकांचे पेमेंटविषयक डिटेल्स भारतीय सर्व्हरवर सेव्ह करण्याचे जाहीर केले आहे.

व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरवर लवकरच पेमेंट प्रणाली येणार असल्याची माहिती कधीपासूनच समोर आलेली आहे. खुद्द कंपनीनेही याला दुजोरा दिलेला आहे. याला बीटा म्हणजेच प्रयोगात्मक अवस्थेत कार्यान्वितदेखील करण्यात आलेले आहे. तथापि, सुरक्षाविषयक कारणांमुळे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून याला सर्व युजर्ससाठी लागू करण्यात आलेले नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारने अजून या पेमेंट प्रणालीसाठी हिरवा कंदील दाखवलेला नाही. यात युजर्सच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेचा प्रश्‍न हा कळीचा आहे. व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरने केंद्र सरकारच्या युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम सुरू करण्याला मान्यता दिली आहे. तथापि, या प्रणालीशी संबंधीत सर्व डाटा हा भारतीय सर्व्हरवरच ठेवावा अशी अट केंद्र सरकारने घातली आहे. व्हाटसअ‍ॅपने याला पहिल्यांदा नकार दिला होता. आता मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करत आपण आरबीआयचे सर्व निकष मान्य करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजेच व्हाटसअ‍ॅप आपल्या युजर्सच्या पेमेंट सिस्टीमशी संबंधीत सर्व डाटा हा भारतातील सर्व्हरवर सेव्ह करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे व्हाटसअ‍ॅप पेमेंट सिस्टीम येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्ससाठी अधिकृतपणे लाँच करण्यात येईल हेदेखील मानले जात आहे.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅपने एकीकडे भारतीय बाजारपेठेच्या माध्यमातून आपल्या पेमेंट सिस्टीमचा श्रीगणेशा करण्याची तयारी केली असतांना दुसरीकडे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या हालचालीदेखील सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने लवकरच व्हाटसअ‍ॅप स्टेटसवर जाहिराती येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. या जाहिराती २४ तासांसाठीच लाईव्ह राहतील की यात काही सुधारणा करण्यात येईल? याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपसाठी उत्पन्नाचा नवीन मार्ग खुलणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here