व्हाटसअ‍ॅपवर स्पायवेअरचा हल्ला; युजरची संपूर्ण माहिती चोरली जाण्याचा धोका

0

फेसबुकच्या पाच कोटी खात्यांची माहिती हॅक झाल्यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता एका स्पायवेअरमुळे व्हाटसअ‍ॅप युजरची संपूर्ण माहिती लीक होत असल्याचे उघडकीस आले आहे.

फेसबुकच्या तब्बल अंदाजे पाच कोटी युजर्सची माहिती हॅक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे. अज्ञात हॅकर्सच्या समूहाने फेसबुकच्या ‘व्ह्यू अ‍ॅज फिचर’च्या माध्यमातून या युजर्सच्या अकाऊंटमध्ये मागच्या दाराने प्रवेश मिळवला. या माध्यमातून हॅकर्सनी अ‍ॅक्सेस टोकन्सवर कब्जा मिळवला. ही एक प्रकारची ‘डिजीटल की’ असून याच्या मदतीने त्या युजरच्या फेसबुक अकाऊंटची सर्वांगीण माहिती चोरली जाऊ शकते. फेसबुकवरील हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावर मात करण्यासाठी फेसबुकचे पथक अहोरात्र मेहनत करत आहेत. दरम्यान, हे सारे सुरू असतांना फेसबुकचीच मालकी असणार्‍या व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरमध्येही एका स्पायवेअरने धुमाकूळ घातल्याची माहिती समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत झेडनेट या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरमध्ये एका स्पायवेअरने धुमाकूळ घातला आहे. कोणत्याही युजरची चॅटींग अथवा त्याच्या सर्व ग्रुप्सची माहितीच नव्हे तर त्या अ‍ॅपची माहिती व सर्वात धक्कदायक म्हणजे संबंधीत उपकरणाचीही (स्मार्टफोन) सर्वांगीण माहिती चोरण्यात येत असते. यामध्ये कॉल लॉग, ब्राऊजींग हिस्ट्री आदींचाही समावेश असतो. म्हणजे व्हाटसअ‍ॅप अ‍ॅपसह त्या युजरच्या स्मार्टफोनवरही या माध्यमातून कब्जा मिळवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा स्पायवेअर सध्या डेव्हलपींग फेजमध्ये असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. ‘जी डाटा सिक्युरिटी लॅब’ या सायबर सुरक्षा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीला याबाबत सर्वप्रथम माहिती मिळाली आहे. हा स्पायवेअर ‘ओन मी’ या नावाचा असून याचा सोर्स कोडदेखील या कंपनीनी गिटहब या संकेतस्थळावर जगजाहीर केला आहे. खरं तर, रॅन्समवेअरच्या माध्यमातून हल्ला झाल्यास युजर्सच्या पेमेंट डिटेल्सची माहिती चोरली जाण्याचा धोका असतो. स्पायवेअर या तुलनेत कमी घातक असल्याचे मानले जाते. तथापि, यातून युजरची इत्यंभूत माहिती जाहीर होत असल्यामुळे यालाही धोकेदायक मानले जाते.

हल्ला झाल्याचे कसे ओळखाल ?

एखाद्या व्हाटसअ‍ॅप युजरच्या अकाऊंटवर ओनमी या स्पायवेअरने हल्ला केल्यास त्याला त्याच्या स्मार्टफोनवर पॉप-अप या प्रकारातील विंडो दिसू लागते. यावर सर्व्हीस स्टार्टेड असे लिहलेले असते. यावर क्लिक केल्यास ‘स्टार्ट एक्सप्लॉईट ()’ हे फंक्शन कार्यान्वित होते. यानंतर या स्मार्टफोनवर इंटरनेटचे कनेक्शन सुरू असल्यास या माध्यमातून हा स्पायवेअर क्रियाशील होतो. हा स्पायवेअर अद्याप प्राथमिक अवस्थेत असून येत्या काही दिवसांमध्ये विक्राळ स्वरूप धारण करू शकतो, असा इशारा या वृत्तामध्ये देण्यात आला आहे. अर्थात. ही माहिती समोर आल्याबरोबर व्हाटसअ‍ॅपच्या तंत्रज्ञांनी यापासून युजर्सला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here