व्हाटसअ‍ॅपवर लवकरच टच आयडी व फेस ऑथेंटीकेशनचे सुरक्षा कवच

0

विविध सोशल साईटस् आणि मॅसेंजर्सप्रमाणे व्हाटसअ‍ॅप या मॅसेंजरवरही सुरक्षा हा कळीचा मुद्दा बनला आहे. कोणताही युजर हा वैयक्तीक आणि ग्रुपमध्ये सुरक्षितपणे चॅटींग करू शकावा यासाठी या कंपनीचे तंत्रज्ञ नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी युजर्सला वेळोवेळी सुरक्षेशी संबंधीत विविध फिचर्स देण्यात येत आहेत. व्हाटसअ‍ॅपवर आधीच एंड-टू-एंड एकक्रिप्शनचे अभेद्य कवच प्रदान करण्यात आलेले आहे. मात्र हॅकर्स विविध प्रकारांनी कोणत्याही युजरच्या अकाऊंटमध्ये प्रवेश करून गैरप्रकार करत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमिवर, व्हाटसअ‍ॅपवर लवकरच सुरक्षाविषयक दोन नवीन फिचर्स येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हाटसअ‍ॅपच्या आगामी फिचर्सबाबत अतिशय अचूक अशी भाकिते करणार्‍या WaBetainfo या संकेतस्थळाने याचे सूतोवाच केले आहे.

WaBetainfo या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार व्हाटसअ‍ॅप मॅसेंजरच्या चेंजलॉगचे अध्ययन केल्यानंतर यावर लवकरच टच आयडी आणि फेस आयडी हे दोन सुरक्षाविषयक फिचर्स देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही फिचर्स अगदी प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे कुणालाही याला सध्या तरी वापरता येणार नाही. तथापि, आगामी कालखंडात पहिल्यांदा आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात येणार असल्याची माहिती या वृत्तात देण्यात आलेली आहे. जगभरातील बहुतांश स्मार्टफोन्समध्ये टच आयडी आणि फेस ऑथेंटीकेशनची सुविधा देण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून कुणीही आपले बोट अथवा चेहर्‍याच्या मदतीने स्मार्टफोन अनलॉक करू शकतो. अगदी याच पध्दतीने आगामी कालखंडात व्हाटसअ‍ॅप अनलॉक करण्याची सुविधा मिळणार आहे. अर्थात युजरच्या परवानगीविना कुणीही त्याचा मॅसेंजर खोलू शकणार नाही. यामुळे अर्थातच व्हाटसअ‍ॅपच्या युजर्सला लाभ होणार आहे. विशेष बाब म्हणजे हे नवीन फिचर कार्यान्वीत करतांना युजर्सच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. युजरचे फिंगरप्रिंट तसेच फेस ऑथेंटीकेशन प्रणालीतील कोणतीही माहिती ही व्हाटसअ‍ॅपच्या सर्व्हरवर संग्रहीत होणार नसल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. कुणीही युजर आपल्या सेटींगमध्ये जाऊन सुरक्षेचे हे अतिरिक्त कवच कार्यान्वित करू शकणार आहे. येत्या कालखंडात हे दोन्ही फिचर आयफोन युजर्सला वापरता येतील असा दावा यात करण्यात आलेला आहे. यानंतर याला अँड्रॉइड युजर्ससाठी कार्यान्वित करण्यात येईल अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here