वेबकॅम समोर नाचा…गुगलची जादू अनुभवा !

0

वेबकॅम समोर नाचणार्‍या युजर्ससाठी गुगलने अनोखी प्रणाली विकसित केली असून याच्या माध्यमातून एक भन्नाट अनुभूती घेता येणार आहे.

गुगल नेहमीच युजर्सला अनोखी अनुभूती प्रदान करण्याचा प्रयत्न करत असते. या अनुषंगाने आता मुव्ह मिरर ही नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याला मशिन लर्नींग आणि आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स या प्रणालीवर विकसित करण्यात आले आहे. या प्रणालीचा कोणत्याही युजरच्या वेबकॅमला अ‍ॅक्सेस दिल्यास एक भन्नाट अनुभूती घेता येणार असल्याचे गुगलने जाहीर केले आहे.

गुगलच्या प्रणालीशी कनेक्ट असणार्‍या वेबकॅम समोर कुणीही युजर नाचू लागल्यास त्या युजरच्या शारिरीक हालचालींशी संबंधीत इंटरनेटवर असणार्‍या विविध प्रतिमांना याच्याशी जोडण्यात येते. गुगलच्या मते एकाच वेळेस तब्बल ८० हजार प्रतिमांची पडताळणी यातून करण्यात येते. आणि याला अगदी रिअल टाईम या प्रकारात त्या युजरच्या हालचालींना जोडून याचे जीआयएफ अ‍ॅनिमेशन तयार करण्यात येते. ही अतिशय जगावेगळी अनुभूती युजर आपल्या संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो. या अ‍ॅनिमेशनला सोशल मीडियात शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

मशीन लर्नींग व कृत्रीम बुध्दीमत्ता हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तथापी याला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये अतिशय परिणामकारक पध्दतीने वापरता येणार असल्याची चुणूक आतापासूनच दिसून येत आहे. या अनुषंगाने मुव्ह मिरर ही प्रणाली युजर्सला या तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख करून देण्यास सक्षम असल्याचे गुगलतर्फे सांगण्यात आले आहे. गुगलच्या क्रियेटिव्ह लॅबने याला विकसित केले आहे. याच्या मदतीने युजरच्या हालचालींना ट्रॅक करणे सहजशक्य होणार आहे. योग तसेच विविध क्रीडा प्रकारांमधील प्रशिक्षणामध्ये याचा खूप उपयोग होण्याची शक्यता आहे. यात संगणक वा लॅपटॉपमधील वेबकॅम अथवा स्मार्टफोनमधील फ्रंट कॅमेरा सर्वात मोलाची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट आहे.

पहा : गुगल मुव्ह या प्रणालीची एक चुणूक दाखविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here