वेअरेबल्समध्ये शाओमीची जोरदार मुसंडी !

0
शाओमी मी बँड ३ फिटनेस ट्रॅकर'xiaomi mi band 3 fitness tracker

शाओमीने वेअरेबल्स अर्थात परिधान करण्यायोग्य उपकरणांच्या निर्मितीत अ‍ॅपलला मागे सारून पहिल्या क्रमांकावर मुसंडी मारली आहे.

इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच आयडीसी या संस्थेने वेअरेबल्स उत्पादनाच्या विक्रीबाबतचा तिसर्‍या तिमाहीचा अर्थात जुलै ते सप्टेंबर-२०१८ या कालखंडातील अहवाल नुकताच जाहीर केला आहे. या कालखंडात जगभरात ३.२ कोटी इतक्या उपकरणांची विक्री झाली. गत वर्षीच्या याच कालखंडातील विक्रीपेक्षा हा आकडा तब्बल २१.७ टक्क्यांनी जास्त आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे शाओमी कंपनीने सर्वाधीक विक्रीचा विक्रम नोंदविला आहे. सध्या अ‍ॅपल कंपनी वेअरेबल्सच्या क्षेत्रात आघाडीवर असतांना या कंपनीला मागे सारून शाओमीने जोरदार मुसंडी मारल्याचे या अहवालातून अधोरेखीत करण्यात आले आहे. शाओमीने अलीकडेच लाँच केलेल्या मी बँड ३ या फिटनेस ट्रॅकरला अतिशय जोरदार प्रतिसाद लाभला आहे. यामुळे शाओमीला अतिशय उत्तम यश संपादन करता आले आहे. चीन आणि भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांसह मध्यपूर्वेतील देश व युरोपात शाओमच्या उपकरणांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अ‍ॅपल या क्षेत्रात आता दुसर्‍या क्रमांकावर फेकली गेली आहे. या कंपनीच्या सेरीज ४ या मालिकेतील स्मार्टवॉचला चांगला प्रतिसाद लाभला असला तरी शाओमीच्या धडाक्यासमोर याचा टिकाव लागला नाही. यामुळे आता अ‍ॅपलची पिछेहाट झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गत तिमाहीत फिटबीट या कंपनीने तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले असले तरी शाओमी आणि अ‍ॅपलच्या कामगिरीचा या कंपनीला मोठा फटका बसल्याचेही अधोरेखीत झाले आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे हुआवे व सॅमसंगला स्थान मिळाल्याचे आयडीसीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here