मायक्रोसॉफ्टने विंडोज ८.१ या प्रणालीचा सपोर्ट काढल्यामुळे यावर चालणारे स्मार्टफोनदेखील काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
विंडोज ८.१ या आवृत्तीवर विंडोजच्या एकूण सुमारे ८० टक्के स्मार्टफोन कार्यरत आहेत. याचा विचार करता आता विंडोज फोनची घटिका भरल्याचे मानले जात आहे. याआधी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ आणि विंडोज ८ या आवृत्त्यांवर चालणार्या स्मार्टफोनचा सपोर्ट ऑक्टोबर २०१४ आणि जानेवारी २०१६ मध्ये आधीच काढलेला आहे. अर्थात यापुढे या दोन्ही तसेच आताच्या ८.१ या आवृत्तीशी संबंधीत सिक्युरिटी पॅच वा अपडेट जारी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी आता विंडोज फोनधारकांना मायक्रोसॉफ्टने अक्षरश: वार्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी विंडोज १० या प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनसाठी सपोर्ट कायम ठेवण्यात आला असला तरी याचा वापर करणार्यांची संख्या तुलनेत कमी आहे. आणि एकंदरीतच अँड्रॉइड व आयओएसच्या धडाक्यासमोर मोबाईल ऑपरेटींग सिस्टीममध्ये विंडोजची झालेली पिछेहाट पाहता भविष्यात परिस्थिती सुधरेल असा आशेचा कोणताही किरण दिसून येत नाही. ब्लॅकबेरीने आधीच ब्लॅकबेरी ऑपरेटींग सिस्टीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर फायरफॉक्स ओएसनेही गाशा गुंडाळला असतांना आता विंडोजची झालेली गत पाहता आगामी काळात अँड्रॉईड व आयओएसला कुणी तगडे आव्हान देण्याच्या स्थितीत नसेल हेदेखील स्पष्ट झाले आहे.