वायू शुध्दीकरण प्रणालीयुक्त एयर कंडिशनर

0

व्हर्लपूल कंपनीने इनबिल्ट अवस्थेत असणार्‍या वायू शुध्दीकरण प्रणालीने सज्ज असणारे एयर कंडिशनर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

भारतीय बाजारपेठेत एयर प्युरिफायर अर्थात वायू शुध्दीकरण उपकरणांची लोकप्रियता हळूहळू वाढत आहे. आता या प्रकारातील अनेक मॉडेल्स किफायतशीर मूल्यात मिळत आहे. यातच प्रदूषणविषयक जागृतीमुळे नागरिकांचा या प्रकारच्या उपकरणांची आवश्यकता भासू लागली आहे. या पार्श्‍वभूमिवर व्हर्लपूल कंपनीने आपल्या नवीन एयर कंडिशनरमध्ये वायू शुध्दीकरण उपकरणाला इनबिल्ट अवस्थेतच देण्याचे जाहीर केले आहे. हे उपकरण थ्रीडी प्युराफ्रेश या प्रणालीवर आधारित असून याच्या मदतीने अगदी पीएम ०.३ इतक्या आकारमानाच्या घातक कणांनाही अटकाव करता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष बाब म्हणजे यात इन्व्हर्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असून यामुळे यासाठी अत्यंत माफक प्रमाणात वीज लागते.

व्हर्लपूल कंपनीने आपले हे नवीन एयर कंडिशनर ०.८; १.०; १.५ आणि २.० टन क्षमतेच्या मालिकेत सादर केले आहे. याला पंचतारांकीत मानांकन असल्यामुळे यासाठी अत्यंत कमी प्रमाणात वीजेचा वापर होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात सिक्थ सेन्स इंटेलीकंफर्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याचा किनारपट्टीसारख्या अत्यंत दमट हवामान असणार्‍या भागात उपयोग होणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तसेच यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे आवश्यक पातळीपर्यंत राहण्यासाठी मदत होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here