वनप्लस ६ स्मार्टफोनचे अनावरण

0

वनप्लस कंपनीने आपल्या वनप्लस ६ या नवीन उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वनप्लस ६ या स्मार्टफोनबाबत अतिशय औत्सक्याचे वातावरण निर्माण झाले होते. विविध लीक्सच्या माध्यमातून याचे फिचर्सदेखील समोर आले होते. या अनुषंगाने लंडन शहरात आयोजित कार्यक्रमात याच्या ग्लोबल लाँचींगचा कार्यक्रम पार पडला. यात या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनचे अनावरण करण्यात आले. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे यात नॉचयुक्त डिझाईन देण्यात आलेले आहे. या नॉचच्या भागात फ्रंट कॅमेरा, प्रॉक्झिमिटी सेन्सर, इयरपीस आणि नोटिफिकेशन एलईडी देण्यात आलेले आहेत. यातील डिस्प्ले हा ६.२८ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा, १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यामध्ये अ‍ॅल्युमिनियमची मजबूत बॉडी प्रदान करण्यात आली असून याच्या मागील बाजूस ग्लासयुक्त कव्हर देण्यात आलेले आहे. वनप्लस ६ या स्मार्टफोनमध्ये अतिशय गतीमान असा क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅगड्रॅगन ८४५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याला ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज; ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज तसेच ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. २२ मे पासून हे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

वनप्लस ६ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. हा कॅमेरा सेटअप व्हर्टीकल म्हणजे उभ्या आकारात प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये १६ आणि २० मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यात २-एक्स इतक्या क्षमतेच्या झूमची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. यामुळे अतिशय दर्जेचार छायाचित्रे घेता येणार असल्याचा वन प्लस कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात २० मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. यामध्ये डॅश चार्ज या जलद गतीने चार्जींग करण्याच्या तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी युएसबी टाईप-सी पोर्टच्या मदतीने चार्ज करता येणार आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारे असून यावर ऑक्सीजन ओएस ५.१.२ हा युजर इंटरफेस असेल. यात अँड्रॉइड पी या अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या अद्ययावत ऑपरेटींग प्रणालीच्या बीटा आवृत्तीचा सपोर्टदेखील देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here