लवकरच येणार हुंदाई सँट्रोची नवीन आवृत्ती

1
नवीन हुंदाई सँट्रो, hyundai santro 2018

हुंदाई कंपनीचे एंट्री लेव्हल या प्रकारातील मॉडेल इऑनचे उत्पादन लवकरच थांबविण्यात येणार असून याची जागा नवीन सँट्रो घेणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

भारतीय बाजारपेठेत किफायतशीर दरातील अर्थात एंट्री लेव्हल या प्रकारातील कारचे मॉडेल खूप लोकप्रिय आहेत. यात अर्थातच मारूती सुझुकीच्या अल्टो या मॉडेलच्या विविध व्हेरियंटचा वाटा लक्षणीय आहे. याला आव्हान निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्यांनी याच सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केले. या अनुषंगाने हुंदाई कंपनीने इऑनच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम पर्याय भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून दिला होता. पहिल्यांदा या मॉडेलला बाजारपेठेत अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला. तथापि, अलीकडच्या काळात याची विक्री अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता इऑनचे उत्पादन थांबविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याऐवजी हुंदाई कंपनी सँट्रो या मॉडेलवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

२०११ मध्ये पहिल्यांदा इऑन मॉडेल लाँच करण्यात आले होते. तर आता या वर्षाच्या अखेरीस याचे उत्पादन थांबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने याबाबत अद्याप तरी अधिकृत घोषणा केली नसली तरी देशभरातील डीलर्सला याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्थात इऑन लवकरच इतिहासमजा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, इऑनची जागा नवीन सँट्रो घेणार असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. सँट्रो हे हुंदाई कंपनीचे अतिशय लोकप्रिय असे मॉडेल आहे. याला येत्या काही महिन्यांमध्ये नवीन स्वरूपात लाँच करण्यात येणार आहे. इऑनऐवजी यालाच कंपनी जास्त प्रमाणात प्रमोट करण्याची शक्यता आहे. साधारणपणे आगामी सणासुदीत याला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.

हुंदाई कंपनीच्या ग्रँड आय १०, एलीट आय २०, क्रेटा आदी लोकप्रिय मॉडेल्सवर ही कंपनी लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. तथापि, यासोबत सँट्रोलाही नवीन स्वरूपात बाजारपेठेत आणले जाणार असल्याचे आता मानले जात आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here