लवकरच येणार अमेझॉनचा मॅसेंजर

0

ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी असणार्‍या अमेझॉनने मॅसेंजर निर्मित केला असून याला लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सध्याचे युग मॅसेंजरचे आहे असे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही व्हाटसअ‍ॅप, फेसबुक मॅसेंजर, व्हायबर, हाईक, टेलिग्राम, आय मॅसेज, अ‍ॅलो आदी मॅसेंजर्सला जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. या पार्श्‍वभूमिवर आता अमेझॉन कंपनीदेखील मॅसेंजर लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात एएफटिव्ही या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार अमेझॉन कंपनी लवकरच एनीटाईम या नावाने मॅसेंजर सादर करणार आहे. एनीटाईमची काही युजर्सच्या माध्यमातून चाचणीदेखील सुरू झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अमेझॉनने आपल्या ग्राहकांकडून आदर्श मॅसेंजरमध्ये नेमके कोणते फिचर्स असावेत ? याबाबत सूचनादेखील मागविल्या आहेत. यासाठी एक अत्यंत व्यापक असा सर्व्हेदेखील सुरू झाला आहे. यावरून आलेल्या सूचनांचा विचार करून एनीटाईम या नावाने नवीन मॅसेंजर लाँच करण्यात येईल असा दावा एएफटिव्हीने केला आहे.

अमेझॉनच्या मॅसेंजरमध्ये सर्व अत्यावश्यक फिचर्स असतील. अर्थात यात वैयक्तीक चॅटींग आणि सामुदायीक ग्रुप्समध्ये संदेश/प्रतिमा/व्हिडीओ आदींची देवाण-घेवाण करता येईल. तसेच यासोबत इमोजी, जीआयएफ आणि स्टीकर्स शेअरिंगचे पर्यायदेखील राहतील. हे मॅसेंजर अँड्रॉइड, आयओएस आणि वेब या तिन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल. व्हिडीओ आणि प्रतिमांना सुशोभित करण्यासाठी यात अत्यंत आकर्षक असे फिल्टर्स देण्यात येतील. तर यावरून उच्च दर्जाचे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करण्यात येतील असे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय यात लोकेशन शेअरिंग, गेमींग, बिझनेस चॅट, कस्टमाईज्ड चॅटींग आदी विशेष फिचर्सदेखील असतील असे यात नमूद करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये अमेझॉनचे एनीटाईम हे मॅसेंजर लाँच करण्यात येईल अशी शक्यता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये …..या चिन्हाने मेन्शन करण्याची सुविधादेखील असेल. एंड-टू-एंड एनक्रिप्शनचे कवच लाभलेल्या या मॅसेंजरमध्ये मोबाईल क्रमांकाने नव्हे तर अमेझॉनच्या अकाऊंटने लॉगीन करण्याची सुुविधा असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here