मराठी डिजीटल प्रकाशकांसाठी लवकरच गुगल अॅड सेन्सची सुविधा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत पुण्यातील सर्च संमेलनात देण्यात आले आहेत.
पुणे येथे नुकत्याच झालेल्या गुगल सर्च संमेलनात सहभागी झालेल्यांना उत्सुकता होती ती गुगल अॅड सेन्सच्या घोषणेची ! यातच दुपारी ३ वाजता अॅडसेन्स पॉलिसी- अव्हॉयडींग मिस्टेक या विषयासाठी स्वतंत्र सेशन होणार असल्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. गुगल कंपनीच्या रिचा शर्मा यांनी हे सेशन घेतले. यात त्यांनी गुगल अॅडसेन्सबाबत सविस्तर उहापोह केला. गुगल कंपनीतर्फे देण्यात येणार्या जाहिराती या जाहिरातदार, प्रकाशक आणि वाचक या तिघांसाठी परिपूर्ण समाधान प्रदान करणार्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात गुगल अॅडसेन्समध्ये या तिन्ही घटकांचा विचार केला जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी त्यांनी मराठी भाषेसाठी गुगल अॅड सेन्सची सुविधा लवकरच देण्यात येणार असल्याची घोषणा केली. भारतात आधी फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषांसाठी गुगल अॅडसेन्स होते. मात्र अलीकडच्या काळात गुगल कंपनीने भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी बंगाली तर अलीकडेच तामिळ आणि तेलगू या भाषांसाठी गुगल अॅडसेन्स लागू करण्यात आले आहे. या अनुषंगाने येत्या तीन-चार महिन्यात मराठी भाषिक डिजीटल पब्लीशर्ससाठीही ही प्रणाली लागू होणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
गुगल अॅडसेन्स हे आधीपासूनच मराठीतल्या काही प्रकाशकांना देण्यात आलेले आहे. ही वर्गवारी लिगसी पब्लीशर्स या प्रकारातील असून याची संख्या अत्यल्प असल्याचेही रिचा शर्मा यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये स्पष्ट केले. तर मराठीतल्या वेबसाईट अथवा ब्लॉगच्या संचालकांनी गुगल अॅडसेन्सच्या जाहिराती मिळवण्यासाठी असणार्या नियमावलीचाही त्यांनी सविस्तर उहापोह केला. गुगल अॅडसेन्सचा मराठी डिजीटल प्रकाशकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्यामुळे आता ही प्रणाली नेमकी कधी लागू होणार ? याबाबत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.