रेल्वे स्थानकावरील वाय-फायसाठी मोजावे लागणार पैसे !

0

गुगलने देशातील निवडक रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय वापरण्याची सुविधा दिली असली तरी यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत.

गुगलने देशातील ५०० रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायच्या माध्यमातून प्रवाशांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दररोज लाखो प्रवासी याचा लाभ घेत असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आली आहे. या सेवेच्या अंतर्गत कोणताही प्रवासी ३० मिनिटांपर्यंत मोफत इंटरनेट वापरू शकतो. यानंतर त्याची वाय-फाय सेवा बंद होते. आता मात्र गुगलने या कालमर्यादेच्या पलीकडेही इंटरनेटची सेवा प्रदान करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थात यासाठी पेड मॉडेलचा वापर करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत. मुंबई आणि चेन्नईतील गुगलचे वाय-फाय वापरणार्‍या काही युजर्सला आता पेड हा पर्याय दिसू लागला असून या संदर्भातील स्क्रीन शॉट सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत. यात २४ तासांसाठी गुगलची वाय-फाय सेवा वापरण्यासाठी १९ रूपये तर एका आठवड्यासाठी १४९ रूपये असतील असे नमूद करण्यात आले आहे.

गुगलने मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय देण्याची घोषणा केली होती. मात्र याच्या वापरासाठी पेड पर्याय उपलब्ध करण्यात आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात गुगलने काही टेक पोर्टल्सकडे आपण या स्वरूपाची चाचपणी करत असल्याचे नमूद करत याला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here