रेनो क्विड २०१८ दाखल : जाणून घ्या फिचर्स

0
रेनो क्विड २०१८,renault kwid 2018

रेनो क्विड या मॉडेलची नवीन आवृत्ती विविध व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली असून यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हल अर्थात किफायतशीर मूल्य असणार्‍या कारचे मॉडेल्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या विभागात आधी मारूती सुझुकीचे वर्चस्व होते. मात्र रेनो कंपनीने क्विडच्या माध्यमातून याला तगडे आव्हान दिले आहे. या मॉडेलचे अल्पावधीतच अडीच लाखांपेक्षा जास्त युनिट विकले गेले आहेत. या अनुषंगाने हे मॉडेल नवीन आवृत्तीच्या स्वरूपात सादर करण्यात येणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर शिक्कामोर्तब करत या कंपनीने क्विडला नवीन स्वरूपात भारतीय बाजारपेठेत उतारले आहे.

रेनो कंपनीचे हे मॉडेल क्विड-२०१८ या नावाने बाजारपेठेत दाखल झाले आहे. याला आठ विविध व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले असून यांचे एक्स-शोरूम मूल्य २.६७ ते ४.५९ लाखांच्या दरम्यान आहे. अर्थात मूळ मॉडेलचा विचार केला असता मूल्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तथापि, यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रिअर इएलआर (इमर्जन्सी लॉकींग रिट्रॅक्टर) ही प्रणाली देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत मागील सीटबेल्टला अधिक लवचीक आणि कार्यक्षम करण्यात आले आहे. या नवीन आवृत्तीत रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर याच्या उच्च श्रेणीतील एएमटी (अ‍ॅटोमॅटीक) व्हेरियंटसाठी ट्रॅफीक असिस्ट हे विशेष फिचर प्रदान करण्यात आले आहे. यामुळे अगदी भर वाहतुकीच्या स्थितीत या मॉडेलला सुलभपणे चालवता येणार आहे. तसेच याच्याच मदतीने उतारावर हळू वेगाने जाण्याच्या स्थितीत कार मागे येण्याचा धोका उद्भवणार नाही. या नवीन मॉडेलचा ग्राऊंड क्लिअरन्स १८० मिलीमीटर असून तो अन्य मॉडेल्सच्या तुलनेत चांगला आहे. यातील कोणतेही व्हेरियंट खरेदी करणार्‍या ग्राहकाला कंपनीतर्फे ४ वर्षे अथवा १ लाख किलोमीटर अंतरापर्यंत रोड साईड असिस्टंन्ससह वॉरंटी प्रदान करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही अतिरिक्त आकारणी करण्यात येणार नाही. ही नवीन आवृत्ती फायरी रेड, प्लॅनेट रेड, मूनलाईट सिल्व्हर, आईसकूल व्हाईट, आऊटबॅक ब्रॉन्झ आणि इलेक्ट्रीक ब्ल्यू या सहा आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे.

रेनो क्विड मॉडेलच्या नवीन आवृत्तीमध्ये ७ इंची आकारमानाची टचस्क्रीन डिस्प्लेयुक्त नेव्हिगेशन प्रणाली देण्यात आली आहे. यात डिजीटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वन टच लेन चेंज इंडिकेटर आदी फिचर्सदेखील दिलेले आहेत. मूळ आवृत्तीनुसारच याची डिझाईन एखाद्या एसयुव्हीप्रमाणे असून ती ग्राहकांना भावणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

रेनो क्विड २०१८ मॉडेलचे विविध व्हेरियंट आणि त्यांचे एक्स-शोरूम मूल्य खालीलप्रमाणे असणार आहे.

१) स्टँडर्ड- २,६६,८००

२) आरएक्सई- ३,०८,८००

३) आरएक्सएल- ३,५५,९००

४) आरएक्सटी ओ (एमटी )- ३,८२,५००

५) आरएक्सटी ओ (एमटी, १ लीटर)- ४,०४,५००

६) आरएक्सटी ओ (एएमटी)- ४३४,५००

७) क्लाईंबर एमटी- ४,२९,५००

८) क्लाईंबर एएमटी-४,५९,५००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here