याहू मॅसेंजर घेणार कायमचा निरोप

0

याहू कंपनीने आपला आयकॉनीक याहू मॅसेंजर बंद करण्याची घोषणा केली असून युजर्सला आपली चॅटींग हिस्टरी डाऊनलोड करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

सोशल साईटचे युग सुरू होण्याआधी याहू मॅसेंजर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. १९९८ साली सुरू झालेल्या या इन्स्टंट मॅसेंजरला जगभरात उदंड प्रतिसाद मिळाला होता. विविध रूम्सचा उपयोग करून या माध्यमातून चॅटींगचे एक नवीन दालन युजर्सला मिळाले होते. काही वर्षे याहू मॅसेंजर लोकप्रियतेच्या शिखरावर होते. मात्र हळूहळू याची लोकप्रियता घसरणीला लागली. फेसबुक व ट्विटरसारख्या मातब्बर साईटच्या उदयानंतर तर याहू मॅसेंजर नष्ट होण्याच्या मार्गावर आले. याहूने यात कालानुरूप अनेक बदल केले तरी फारसा उपयोग झाला नाही. या पार्श्‍वभुमिवर आता याहू कंपनीतर्फे २०१६ मध्येच आपली ही सेवा बंद करण्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस थोडा विलंब झाला आहे. तथापि, आता याहू कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यानुसार आता १७ जुलैपासून याहू मॅसेंजर बंद होणार आहे. तत्पुर्वी युजर्सनी आपापले मॅसेजेस, चॅटींगचे आर्काईव्ह आदींना डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी युजर्सला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. तसेच यापुढी कुणीही युजरने याहू मॅसेंजर वापरण्याचा प्रयत्न केल्यास तो आपोआप ‘स्क्विरल’ या अ‍ॅपकडे ‘रिडायरेक्ट’ होणार आहे.

याहू मॅसेंजरचा प्रवास

याहू कंपनीने ९ मार्च १९९८ रोजी ‘याहू पेजर’ या नावाने मॅसेंजर लाँच केला. यालाच नंतर २१ जून १९९९ रोजी याहू मॅसेंजर या नावाने नव्याने सादर करण्यात आले. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा उदय होण्याआधी या मॅसेंजरने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यात वन-टू-वन या प्रकारातील चॅटींगसह चॅट रूम्सच्या माध्यमातून ग्रुप चॅटींगची सुविधा देण्यात आली होती. तसे हे अ‍ॅप काळाच्या पुढे होते. यात व्हिडीओ कॉलींगसह स्टीकर्सच्या माध्यमातील इमोजीदेखील देण्यात आले होते. यात खूप आधी मल्टीमिडया शेअरींगचीही सुविधा होती. मात्र काळाच्या ओघात याहू मॅसेंजर मागे पडले. यातूनच आता ते काळाच्या पडद्याआड जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here